नवी दिल्ली – ब्युरो ऑफ एनर्जी एफिसियन्सीने एससी, रेफ्रिजरेटर आणि इतर उपकरणावर ऊर्जा कार्यक्षमतेसंदर्भात नवीन स्टार रेटिंग बंधनकारक केले आहे. यामुळे अशा प्रकारची दर्जेदार उपकरणे बनविण्यासाठीचा खर्च वाढणार आहे. अशा परिस्थितीत नव्या वर्षापासून एसी, फ्रिजसह इतर उपकरणाच्या किमती पाच ते दहा टक्क्यांनी वाढणार आहेत. 22 सप्टेंबर रोजी या उपकरणावरील जीएसटी दहा टक्क्यानी कमी केल्यानंतर जेवढया प्रमाणात कमी झाल्या होत्या, तेवढ्याच प्रमाणात या किमती वाढण्याची शक्यता असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. सध्या जागतिक बाजारात तांब्याच्या किमती उच्चांकी पातळीवर आहेत. त्याचबरोबर रुपयाचे सरलेल्या वर्षात 5% अवमूल्यन झाल्यामुळे आयात महगात पडत आहे. याचाही परिणाम या उपकरणाच्या किमतीवर होणार आहे. मात्र अशा प्रकारच्या निर्णयाची गरज होती. त्यामुळे ऊर्जा कार्यक्षमता वाढून पर्यावरण संवर्धन होण्यास मदत होईल असे वोल्टास, डैकीन, ब्लू स्टार, गोदरेज अप्लायन्सेस या कंपन्यांनी नमूद केले. नव्या स्टार रेटिंगमुळे या उपकरणांच्या ऊर्जेची कार्यक्षमता दहा टक्क्यानी वाढणार आहे. तर किंमतही त्याच प्रमाणात वाढेल. ब्लू स्टार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी त्यागराजन आणि गोदरेज एंटरप्राइजसचे उपाध्यक्ष कमल नंदी यांनी सांगितले की, रुपयाचे अवमूल्यन आणि जागतिक व्यापार युद्धामुळे घडणार्या घडामोडीचा ग्राहक वस्तू क्षेत्रावर बराच परिणाम झाला आहे. यामुळे किमती वाढत आहेत. अशा परिस्थितीत विक्री वाढविण्यासाठी या कंपन्यांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत. नंदी म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत एसीच्या किमती पाच ते सात टक्क्यांनी आणि फ्रिजच्या किमती तीन ते पाच टक्क्यांनी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारला ज्या दर्जाची ऊर्जा कार्यक्षमता अपेक्षित आहे, त्या दर्जाची ऊर्जा कार्यक्षमता संबंधित उपकरणांमध्ये उपलब्ध करण्यासाठी महागडे तंत्रज्ञान आणि महागडी उपकरणे वापरावी लागणार आहेत. त्यातच आयात केलेल्या उपकरणांच्या किमती रुपयाच्या मूल्यामुळे वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत जीएसटी कपातीमुळे झालेला फायदा संपुष्टात येणार आहे.