– अमित डोंगरे महेंद्रसिंह धोनी हे नाव घेतले की त्याची सुवर्ण कारकीर्द आठवते. आंतरराष्ट्रीय स्तरावर असो किंवा आयपीएलमधील त्याची वर्चस्ववान कामगिरी असो त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर ही तुफान लोकप्रियतेची प्रतिमा तयार केली. मात्र, आता त्याची हीच प्रतिमा त्याचीच वैरी होत चालली आहे. व कदाचित चाहत्यांचे हे अफाट प्रेमच चेन्नई सुपर किंग्जला मारक ठरत आहे. खुद्द चेन्नई संघाचेच प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनीच याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. महेंद्रसिंह धोनी सामन्यादरम्यान लवकर फलंदाजीला का येत नाही यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. धोनीचे शरीर, त्याचे गुडघे आता पूर्वीसारखे नाहीत. तो व्यवस्थित मुव्ह होतो, पण तरीही ते पूर्णपणे ठिक नाही. धोनी संपूर्ण १० षटकेही मैदानावर फलंदाजी करू शकत नाही. त्यामुळे तो संघासाठी कशी भूमिका बजावणार, हे त्या दिवसासाठी तो ठरवतो, असे फ्लेमिंग म्हणतात त्यात निश्चितच तथ्य आहे. दरवेळी प्रत्येक सामन्यामध्ये धोनी कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येणार यावरून जोरदार चर्चा होते. चेन्नईला गेल्या दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. या दोन्ही सामन्यांमध्ये फलंदाजी क्रमामुळे धोनीवर टीका होत आहे. चेन्नईचे दोन बळी गेले की चाहते धोनीच्या नावाचा पुकारा करतात व अन्य फलंदाज फलंदाजीला आला की त्यालाच तू लवकर बाद हो म्हणजे थाला (धोनी) फलंदाजीला येइल असे म्हणतात हेच आता चेन्नईला मारक ठरत आहे. रॉयल चॅलेंजर बंगळुरुविरूद्ध सामन्यात धोनी ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला, तोपर्यंत सामना संघाच्या हातून निसटला होता. तर राजस्थानविरूद्ध धोनी लवकर फलंदाजीला उतरला पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नव्हता. धोनी ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला, जिथे त्याने १६ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या. धोनीने आपल्या खेळीत तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. मात्र, ९ व्या क्रमांकावर फलंदाजी केल्याबद्दल त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. राजस्थान रॉयल्सविरूद्ध पराभवानंतर फ्लेमिंग यांनी धोनीच्या शारिरीक स्थिबाबत मोठे वक्तव्य केले असून आता चाहते त्यावर कशी प्रतिक्रीया देतात याकडे लक्ष लागले आहे. सामना संतुलित असेल, तर तो थोडा लवकर फलंदाजीला येतो आणि बाकीच्या वेळेस तो इतर खेळाडूंना संधी देतो. तर धोनी या सगळ्या गोष्टी पाहून समतोल साधत आहे. चेन्नईचा संघ धोनीला न खेळवण्याचा विचारही करत नाही. धोनी संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी गेल्या वर्षीही म्हटले होते की तो संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याचे नेतृत्व आणि यष्टिरक्षण खूप मोलाचे आहे, त्यामुळे धोनीला ९-१० षटके खेळण्यासाठी फलंदाजीसाठी पाठवले जाणार नाही. तो इतक्या उशिरा कधीच फलंदाजीसाठी उतरला नाही. तो १३-१४ षटकांनंतरच फलंदाजीला उतरतो. तो काय स्थिती आहे ते पाहतो, अशी सारवासारवही फ्लेमिंग यांनी नंतर केली हा भाग वेगळा. मात्र, जे त्यांच्या मनात आहे ते प्रत्यक्षात उतरायलाही वेळ लागणार नाही. धोनी एकेकाळी संघाचे ओझे एकट्याच्या खांद्यावर वाहात होता आता तोच संघासाठी ओझे बनत आहे. धोनीनेच प्रत्येक सामन्यात खेळावे व कामगिरी करावी अशी चाहत्यांची मानसिकता आहे. म्हणजे आता लता दिदी अफलातून गातात म्हणजे सगळीच गाणी त्यांनीच गावीत असे नाही ना. इंतरांनाही संधी मिळाली पाहीजे तरच त्यांच्यातून अलका याज्ञीक, साधना सरगम पुढे येतात. संघातील धोनीचा सहकारी खेळाडू व एकेकाळचा अव्वल फलंदाज अंबाती रायडू तसेच धोनीचा सच्चा मित्र सुरेश रैनाही हेच म्हणत आहेत की आता तरी धोनीने थांबावे. त्याची लोकप्रियता आहे तोपर्यंतच त्याने निवृत्तीचा निर्णय घ्यावा. लोकप्रियतेला ओहोटी लागली की निर्णय घेण्यात अर्थ नाही. विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी हा पायंडा पाडला की यशाच्या शिखरावर असताना निवृत्ती घ्यायची. पुढील काळात मात्र, त्यांच्यासाराखा धाडसी निर्णय घेणे खुद्द सचिन तेंडुलकरलाही जमले नाही. वास्तविक सचिनने २०११ सालचा विश्वकरंडक जिंकल्यावरच बाय बाय म्हणायला हवे होते. मात्र, त्यावेळी बीसीसीआयने सचिनच्या जीवावर मोठे मोठे करार केले होते व ते कदाचित २०१३ साली संपले त्यामुळे त्यावेळचे निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी सचिनला आता थांब असे सांगितले व सचिनने निवृत्ती जाहीर केली. त्याच्यानंतर धोनीने काही काळातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. त्यावेळी चाहत्यांना हा धक्का होता. अचानक काय घडले का धोनीने हा निर्णय घेतला. मात्र, २०१९ सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत तो धावबाद झाला व त्याचवेळी त्याला आपले शरिर आता थकले आहे व इथेच थांबलेले योग्य असा साक्षात्कार घडला व त्याने तडकाफडकी निवृत्ती घेतली. मात्र, तरीही तो आयपीएल खेळत राहिला. त्याच्या खेळात मुख्यत्वे यष्टिरक्षणात त्याचे काम आजही चोख आहे. मात्र, फलंदाजी करताना तसेच दोन धावा धावताना तो थकल्यासारखा दिसतो. हे आता कदाचित त्याच्याही लक्षात आले असावे मात्र, ब्रॉडकास्टर, जाहिरातदार यांच्या दडपणामुळे चेन्नई संघ व्यवस्थापन त्याला निवृत्ती घेऊ देत नसावेत. तसे पाहायला गेले तर आत्ता चेन्नईच्या संघात धोनी व्यतरीक्त असा एकही खेळाडू नाही की ज्याला पोस्टरबॉय करता येइल. थाला म्हणून धोनीची लोकप्रियता अफाट आहे. कदाचित सचिनपेक्षाही आज धोनीचा चाहता वर्ग मोठा आहे असे म्हटले तरी ते चुक ठरणार नाही. मात्र, प्रत्येक गोष्टीची एक एक्सपायरी डेट असेत तशीच ती लोकप्रियतेचीही असते. धोनीवर अफाट प्रेम करणारी मंडळी कधी त्याच्यावर टीका सुरु करतील याचा नेम नाही. चेन्नई संघाने आयपीएलची पाच विजेतीपदे पटकावली त्यात धोनीचा वाटा मोठा होता यात शंका नाही मात्र, आता त्याच्याकडून या वयात इतक्या मोठ्या अपेक्षा करणेच मुळात चुक आहे. त्याला आता यंदाची आयपीएल पार पडल्यावर साक्षात्कार होइल व तो निवृत्ती जाहीर करेल असेच चित्र सध्यातरी दिसत आहे. महाराष्ट्राचा खेळाडू ऋतूराज गायकवाड याने धोनीकडून कर्णधारपदाचे बॅटन आपल्या हाती घेतले तेव्हाच खरेतर धोनीने आपले वय झाले आहे हे ओळखून थांबणे इष्ट ठरले असते. मात्र, अजूनही वेळ गेलेली नाही. जे चाहते मंदीरे बांधतात, धोनीच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करतात ते त्याचे पोस्टर फाडायलाही कमी करणार नाहीत. दक्षिण भारतात अशी क्रेझ अनेकांची आहे मात्र, काहीवेळा या क्रेझचा अतिरेक होतो व तोच सध्या धोनीच्या बाबतीत दिसत आहे. एका महान व्यक्तीने तर धोनीला एका जाहिरातीत प्रत्यक्ष विष्णु भगवानांच्या रुपातही प्रदर्शित केले होते. त्या खटल्याचे अद्याप काय झाले ते कळले नाही मात्र, इतकी टोकाची लोकप्रियता असणेही घातक असते. आज धोनीकडे खूप मोठे मोठे ब्रॅंड आहेत. त्याच्या जाहीरातीही सामनादरम्यान आपण पाहातो. त्याच्याकडे आदर्श, युथ आयकॉन म्हणूनही पाहिले जाते. रांची सारख्या एका छोट्या गावातून आलेला हा खेळाडू आज जागतिक स्टार बनला याचा अभिमान आहेच परंतू प्रत्येकाचा एक काळ असतो. राजेश खन्ना सपर स्टार असताना दिल्ली विमानतळावरून बाहेर यायला त्याला चार तास लागले होते इतकी चाहत्यांची गर्दी उसळळी होती. तोच राजशे खन्ना नंतरच्या काळात दिल्ली विमानतळावर आला असताना एकाही व्यक्तीने त्याला साधे ढुंकुनही पाहीले नाही. आहोटी यालाच म्हणतात. खुद्द अमिताभ बच्चनलाही याचा फटका बसला आहे तिथे इतरांची काय कथा. असो, चेन्नई संघात धोनी नसेल तर चित्र कसे असेल याचाच सध्या विचार केला जात आहे. फ्लेमंगही हेच म्हणाले मात्र, जर धोनीलाच खेळवत राहिले तर नवा स्टार उदयाला कधी येणार. नवोदितांना संधी कधी मिळणार व ते स्वतःला सिद्ध कधी करणार. वेस्ट इंडिजचे स्टार खेळाडू १५ ते २० वर्षे खेळत राहिले व नवोदितांनी क्रिकेट सोडून अमेरिकेतील बास्केटबॉल जवळ केले व आज वेस्ट इंडिज क्रिकेटची काय स्थिती बनली आहे हे आपण पाहातच आहोत. यंदाच्या चॅम्पियन्स स्पर्धेलाही ते पात्र ठरु शकले नाहीत.तशीच स्थिती काही वर्षांनी चेन्नई संघाची झाली तर नवल वाटणार नाही. कठोर निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे त्यामुळे धोनीने निर्णय घेतला नाही तर तो संघ व्यवस्थापन व संघ मालकांनी घेतला पाहीजे. अन्यथा पाच वेळा आयपीएल जिंकणारा संघ पुढील काळात असाच पराभूत होताना पाहावा लागेल. आज धोनीला ट्रोल केले जात आहे, त्याच्यावर गंमतीशीर व्हिडीओही बनवले जात आहेत. हीच गंमत येत्या काळात चेन्नई संघाला व धोनीला मारक ठरेल.