पुणे – काही दिवसांपूर्वीच दर्शना पवार हिची मित्राकडूनच हत्या झाल्याची घटना घडली. यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यात या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत महाविद्यालयीन तरुणीवर एमपीएससी करणाऱ्या मित्रानेच कोयत्यानं हल्ला केला आहे. विशेष म्हणजे वर्दळीच्या परिसरात ही घटना घडल्याने अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहे. सध्या या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तरुणीवर जेव्हा हल्ला झाला, तेव्हा तिच्यासोबत आणखी एक मित्र होता. तेव्हा अचानक आरोपी तरुणाने मुलीवर हल्ला केला. तेव्हा मुलगी जीव मुठीत घेऊन धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी तिने मदतीसाठी लोकांना बोलावले, मात्र कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही. अखेर एका तरुणाने या मुलीची मदत केली आणि तरुणीचे प्राण थोडक्यात बचावले. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
आरोपी तरुणाने मुलीवर हल्ला करण्यास सुरुवात केली, तेव्हा ती तेथून धावत होती. त्यानंतर लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिच्या मदतीसाठी धावून आला. कोयता हातात असलेला तरुण तरुणीच्या डोक्यावर प्रहार करणार एवढ्यात मदतीसाठी धावून आलेल्या तरुणानं कोयता धरला आणि हल्लेखोर तरुणाला रोखलं. त्यानंतर इतर लोक मदतीला आले. यानंतर लोकांनी या प्रकरणाची पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतले.