पुणे जिल्हा | युवा मतदार ठरवणार इंदापूरचा भावी आमदार

इंदापूर, {नीलकंठ मोहिते} – तालुक्यात अनेक प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवले जातील, असा बोलबाला होतो; मात्र खर्या अर्थाने जनतेच्या हाताला फसवणुकीशिवाय काही लागत नाही. ज्या प्रश्नांचा कधी विचार झाला नव्हता, अशा गोष्टीत नेता जनतेला अडकवतो.
याचा सोक्ष-मोक्ष करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील युवा मतदार सज्ज झाला असून, मागील काही दिवसात तालुक्यात ज्या राजकीय घडामोडी झाल्या, यामध्ये युवकांचा सहभाग मोठा दिसतोय. म्हणून युवा मतदार ठरवणार इंदापूरचा भावी आमदार असे चित्रच स्पष्ट झाले आहे.
एकंदर इंदापूर तालुक्याचे आगामी राजकारण युवकांच्या हाती, असे स्पष्ट संकेत पुढे येत आहेत, यंदा इंदापूर विधानसभा मतदार संघातील युवक प्रचारासाठी बाहेर पडणार, त्यामुळे इंदापूर तालुक्याचा भावी आमदार हा युवकांच्या इच्छेनुसार होणार्या यामध्ये तिळमात्र शंका नाही.
हर्षवर्धन पाटीलांना तुतरीची साथ
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पक्षप्रवेश करण्याअगोदरच, पाटील साहेब तुम्ही निर्णय घ्या. असा आग्रह गावागावातील युवकांचाच मोठ्या प्रमाणात होता.
शेवटी युवक शेतकरी व सर्व घटकातील सामान्य जनतेचा विचार करून, हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेश केलेल्या पहिल्या दिवसापासून हर्षवर्धन पाटील यांचे समर्थन करणारा युवा वर्ग प्रचंड खूश झाला असून,
युवक नेते राजवर्धन पाटील तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अंकिता ठाकरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यामध्ये जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून हजारो युवक युवतींना एकत्र आणण्याची किमया, करण्याचा प्रारंभ तालुक्यातील व्याहळी गावातून करण्यात आला.
प्रवीणभैय्या आगे बढो…
दुसरीकडे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांना भैय्या आता तुम्हाला इंदापूर तालुक्याचे आमदार व्हायचे आहे. तुम्ही इंदापूर विधानसभा लढवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
अशी साद अनेक गावातील युवकांनी एकमुखाने दिल्यामुळे तालुक्यात नव्याने निर्माण झालेल्या तिसर्या आघाडीतील युवा उमेदवारीचा फिक्स चेहरा म्हणून प्रवीण माने नावारूपाला आले आहेत.
आप्पासाहेब जगदाळे प्रतीक्षेत
याच जोडीला, मागील काही दिवसात झालेल्या परिवर्तन मेळाव्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांना कणखरपणे साथ देणारा युवा वर्ग देखील प्रचंड प्रमाणात दिसत आहे.
तिसर्या आघाडीत प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे या दोघांपैकी एक उमेदवार माने, जगदाळे व भरत शहा यांच्या नेतृत्वाखाली जनतेसमोर येणार आहे.
भरणे मामांची क्रेझ कायम
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी शासनाच्या माध्यमातून तालुक्यातील, अनेक युवा युवतींना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली आहे.
सामान्य प्रशासन या मंत्रिपदावर आमदार भरणे असताना स्पर्धा परीक्षा देणार्या युवा वर्गासाठी, ठोस निर्णय ठोस भूमिका आमदार भरणे यांनी घेतल्याने उच्चशिक्षित युवा वर्ग यांच्या मनामध्ये भरणे यांच्याबद्दल आदर दिसतो आहे.
यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्यासाठी युवक नेते श्रीराज भरणे यांच्यासह गावागावातील युवा फळी पुढे आली आहे.

