नागपूर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाही महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे. ज्याचा उद्देश बेरोजगार तरुणांना रोजगार-भिमुख प्रशिक्षण देणे आणि त्यांना आर्थिक सहाय्य करणे आहे. यात बारावी उत्तीर्ण तरुणांना प्रशिक्षण कालावधीत दरमहा 6,000 ते 10,000 रुपयापर्यंत भत्ता मिळतो. मात्र 11 महिने प्रशिक्षण घेतल्यानंतरही कायमस्वरुपी नोकरी न मिळाल्याने तरुण-तरुणी आक्रमक झाले आहेत. चार दिवस आंदोलन केल्यानंतर आज (13 डिसेंबर) तरुण-तरुणींनी अधिवेशनात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून तरुण-तरुणींची धरपकड करण्यात आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून 11 महिने प्रशिक्षण घेतल्यानंतरही कायमस्वरुपी नोकरी मिळाली नाही. त्यामुळे समग्र शिक्षा अभियान संघर्ष समितीच्या माध्यमातून 9 डिसेंबरपासून तरुण आणि तरुणींनी नागपुरात आंदोलनाला सुरुवात केली. मात्र प्रशासनाकडून कोणीही चर्चेला आले नाही. त्यातच रविवारी (14 डिसेंबर) हिवाळी अधिवेशन संपणार आहे. त्यामुळे मागण्यासंदर्भात जीआर निघावा, यासाठी तरुण-तरुणी आक्रमक झाले आणि त्यांनी अधिवेशनात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी गेटवरच त्यांना थांबवले आणि काही जणांना ताब्यात घेतले. दरम्यान, आंदोलकांकडून आधी शांततेत आंदोलन सुरु होते. पण आपल्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही म्हणून त्यांनी लोटांगण मोर्चा विधान भवनाच्या दिशेला काढला. पण या मोर्चा पोलिसांनी अडवला. आम्ही प्रशिक्षणार्थी आहोत. आमची मागणी आहे, आमचा जीआर निघालाच पाहिजे, असे आंदोलक तरुण म्हणाले. याबाबत विस्तृत माहिती घेतली जाईल. त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत, तसेच त्यांच्या मागण्या कुठे अटकल्या आहेत याची सविस्तर माहिती घेतली जाईल. त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांची समस्या सोडवण्यात येतील. तरुणांची अडचण सोडवली जाईल. – पंकज भोयर, राज्यमंत्री