सोशल मीडियावरील प्रचारात तरुणाई व्यस्त

– विशाल वर्पे

केंदूर – राजकीय आखाड्यात विधानसभेची गणिते जुळली आहेत. या माध्यमातून राजकीय नेते, कार्यकर्ते आपआपल्या पक्षांची ध्येय धोरणे, लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. स्मार्ट फोन आला आणि शारीरिक खेळ जवळपास संपुष्टात येऊ लागले आहेत. याच स्मार्ट फोनमुळे तरुण पिढीला जगाशी जवळीक साधता आली आहे. मात्र, या इंटरनेट आणि स्मार्ट फोनमुळे तितक्‍याच प्रमाणात तरुण मंडळी दुरावली आहेत. सोशल मीडियाचा वापर करीत राजकीय प्रचारासाठी केला जात आहे.

सोशल मीडियाचा वापर राजकीय मंडळी पुरेपूर वापर करीत आहेत. नव्याने राजकारणात पदार्पण करणारे युवक नेते ज्येष्ठ नेत्यांची वाहवा करण्यात पूर्ण वेळ खर्च करीत आहेत. फेसबुकवर सध्या चर्चासत्र सुरू असतात. त्यात कोण आपल्या नेत्यांनी केलेल्या कामांचा पाढा वाचत आहे. तर त्याचा विरोधक त्याचे खंडन करून ही सर्व कामे माझ्याच नेत्याने केले आहेत, याचे दाखले देत आहेत. काही महाशय मात्र अपूर्ण माहिती आणि अपूर्ण ज्ञानाचा विचार न करता आपली पात्रता सोडून खालच्या स्तरावर जाऊन नेत्यांवर टीका करत आहेत, अशा महाशयांवर निवडणूक आयोगाचे पूर्ण लक्ष असल्याचे अधिकारी सांगत आहेत.

काही युवक मोबाईल, आपला रिचार्ज वापरून नेत्यांची बाजू मांडत आहेत. हे युवक एकमेकांना उद्देशून फेसबुक, व्हॉट्‌सऍपवर टीका, टिप्पणी करतात. कधी कधी याचाच राग मनात धरून या युवकांमध्ये लढाई होत आहे. आपल्या नेत्यांसाठी एकमेकांची डोकी फोडायला देखील हे युवक मागेपुढे पाहत नाहीत. नेत्यांच्या मागे मागे करून सेल्फी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून आपल्या नेत्याचे आणि आपले किती जवळचे संबंध आहेत, याची छबी झळकविण्यात तरुणाई व्यस्त आहे. मात्र, आपली ही तरुण मित्र मंडळी दुरावत आहेत. गावोगावी दोन ते तीन पक्षांचे प्राबल्य आहे. एकमेकांच्या विरोधात बदनामीचे संदेश व्हायरल करून गावागावांमध्ये दुफळी निर्माण होत आहे. मात्र, राजकारण हे मर्यादित ठेऊन मैत्रीपूर्ण संबंध जोपासले पाहिजे.

गावामध्ये एकत्र येऊन दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून आपल्या गावचा विकास कसा होईल, याकडे कोणाचेही लक्ष नाही. यासाठी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. गावपातळीवरील दोन्ही नेते एकमेकांचे राजकीय विरोधक जरी असले तरी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असतात. त्याच नातेसंबंध असतात. मात्र, आपला तरुण आपल्या नात्यात आणि मैत्रीत दुरावा निर्माण करीत आहे. यामुळे याचा फायदा राजकीय जीवनात त्या त्या नेत्यांना होत आहे. युवकांच्या मात्र, वैयक्‍तिक जीवनात याचा तोटा होत आहे. याचे भान तरुणांनी ठेवायला हवे. तरच सोशल मीडियाचा वापर विधायक कामासाठी करता येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)