मंचर/डिंभे -भीमाशंकर जवळील कोंढवळ येथील धबधब्यात एकाचा पडून मृत्यू झाला. आज (गुरुवारी) ही घटना घडली. लक्ष्मण सोन्याबापू लाहारे (वय 29, सध्या रा. शिक्रापूर; मूळ रा. राहाता, अ. नगर) असे या तरुणाचे नाव आहे.
करोना काळात पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. तरी काही हौसी पर्यटक भीमाशंकर परिसरात बिनधास्त वावरत असतात. येथील पोलिसांच्या दुर्लक्षाने ही घटना घडल्याचे येथील परिसरात चर्चा सुरू आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात ठिकठिकाणी धबधबे आहेत. यात कोंढवळ धबधबा नेहमीच पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. या परिसरात फिरत 4-5 जण धबधब्याजवळ गेले असता येथे लक्ष्मणचा पाय घसरला व तो धबधब्याच्या चोहडीत गेला.
यात त्याचा मृत्यू झाला. घोडेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी एल. जी. थाटे हे दिपक काशिद, जयराम वाजे पोलिसांसह घटनास्थळी आले.
स्थानिक लोक, पोलीस पाटील, सरपंच यांच्या मदतीने मृतदेहाचा शोध रात्रीपर्यंत सुरू होता. तहसीलदारांच्या मदतीने एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे.
सुरक्षा महत्त्वाची
कोंढवळ धबधबा परिसर हा सुरक्षित असणे गरजेचे आहे. येथे पर्यटकांना मुक्त संचार करण्यास बंदी घालण्यात आली असताना अनेक घटना येथे घडूनही वन्यजीव विभाग व पोलीस यंत्रणा गाफिल राहत असल्याने अनेकांचा बळी येथे जात आहे.