महाविद्यालयीन विद्यार्थिनींना अडवून तरुणीची राजकीय ‘नेत्याच्या’ नावाने दमबाजी; परिसरात खळबळ

वाई (प्रतिनिधी) – जीनची पॅंट घातलेल्या एका तरुणीने किसन वीर महाविद्यालयाच्या काही विद्यार्थिनींना वाई-पाचगणी रस्त्यावर कॅनॉलनजीक अडवून फिल्मी स्टाइलने धटिंगशाही केली. जिल्ह्यातील एका वजनदार राजकीय नेत्याचे नाव घेऊन ही तरुणी विद्यार्थिनींना धमकावत असल्याने खळबळ उडाली. या प्रकाराची सखोर चौकशी करायची मागणी शिवसेनेच्या विवेक भोसले यांनी केली आहे.

याबाबत माहिती अशी, किसन वीर महाविद्यालयाचे सकाळचे सत्र संपण्याच्या वेळेत वाई-पाचगणी रस्त्यावर कॅनॉलजवळ झेरॉक्‍स सेंटरच्या बाजूला उभी असलेली एक तरुणी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना अडवत होती. ही तरुणी जोरजोरात हातवारे करून विद्यार्थिनींना दमबाजी करत होती.

शिवसेनेचे विवेक भोसले हे या रस्त्याने जात असता, त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी मोबाइल कॅमेऱ्याने शूटिंग करायचा प्रयत्न केला. हे लक्षात आल्यावर त्या तरुणीने पळ काढला.

भोसले यांनी वाई पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सपोनि राजेंद्र कदम व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथून जवळच्या वस्तीत लपून बसलेल्या तरुणीला त्यांनी ताब्यात घेतले. त्यावेळी तिने एका राजकीय नेत्याचे नाव घेऊन “दबंग’गिरी करत तेथून पलायन केले.

दरम्यान, येथील बसस्थानक परिसरात व वाई-पाचगणी रस्त्यावर महाविद्यालयीन तरुणांच्या गटांमध्ये वादावादी, मारामारी नित्याचीच झाली आहे. त्यात अनेकदा दगड, काठ्यांचा वापर होतो. महाविद्यालयाच्या वेळेत कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट व इतर वाहनांचा वापर करून तरुणींची छेड काढण्याचे प्रकारदेखील घडत आहेत.

पोलिसांनी शहरात व महाविद्यालयाच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत; परंतु तरुणांचे गट या कॅमेऱ्यांच्या कक्षेबाहेर एकमेकांना अडवून, वाहने आडवी मारून मारामारी करत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले असून पोलिसांनी या प्रकारांनला पायबंद घालावा, अशी मागणी होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.