कोलकात्यात डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून खून; इयरबड्सच्या तुकड्यावरुन पकडला आरोपी

कोलकाता – कोलकात्यामध्ये आर. जे. कर राज्य सरकारी रुग्णालयात एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात बलात्कार व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३१ वर्षीय डॉक्टरचा मृतदेह शुक्रवारी (९ ऑगस्ट) सकाळी रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळला होता. चौकशी अहवालानुसार, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहावर अनेक जखमा दिसत होत्या. तसेच मृतदेहावर अर्धवट कपडे होते. या घटनेमुळे रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून सखोल चौकशीच्या मागणीसाठी अनेक डॉक्टरांनी काम बंद केले आहे.
शनिवारी इतर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरही या आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला आज सियालदह न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी सांगितले की अटक केलेला आरोपी संस्थेबाहेरचा आहे. मात्र त्याचे रुग्णालयात नेहमी येणे-जाणे होते. त्यामुळे त्याला रुग्णालयाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये सहज ये-जा करता येत होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी म्हटले आहे की त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या.
तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणातील आरोपीचा शोध घेत असताना त्यांना एका ब्लूटूथ ईयरबडचा छोटासा तुकडा सापडला होता. या छोट्याशा पुराव्याच्या आधारावर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकले. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर रुग्णालयातील इतर डॉक्टरांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर आरोपीची ओळख पटवली.





