Rohit Pawar : पुरावेच लागतात ना? अंधभक्तांनो घ्या आता पुरावे..! महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते : रोहित पवार
Rohit Pawar : यानंतर आता सोशल मीडियावर एक पोस्ट करत रोहित पवारांनी एक धक्कादायक प्रकार समोर आणला आहे.

Rohit Pawar : नीट पेपरफुटीप्रकरणी देशभरात विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची धग इतर राज्यात पसरत असल्याचे लक्षात आल्यावर अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देणं भाग पडलं. यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपावरून चांगलीच झुंपली. नीटपेपरफुटीनंतर आता महाराष्ट्रात देखील पेपर फुटीचा आरोप होत आहे.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एमपीएसी परीक्षेतील औषध निरीक्षकचा पेपर फुटल्याचा गंभीर आरोप केला होता. याशिवाय नीटची फेरपरीक्षेचा देखील पेपर फुटला असल्याचा दावा करत गुजरात राज्यात तीन दिवस आधीच हा पेपर फुटल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. यानंतर आता सोशल मीडियावर एक पोस्ट करत रोहित पवारांनी एक धक्कादायक प्रकार समोर आणला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
फडणवीस साहेब मानले राव तुमच्या सरकारच्या कारभाराला.!
रोहित पवारांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कथित गैरप्रकार समोर आणला आहे. या संदर्भात पुणे विद्यापीठाने प्रसिद्ध केलेली कथित प्रेसनोट ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. पेपर फोडायचा, प्रवेश मिळवायचा आणि तीन चार वर्षात डिग्री, एवढी उठाठेव कशाला? महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते. उच्च शिक्षणमंत्री आता तरी झोपेतून उठा…! फडणवीस साहेब मानले राव तुमच्या सरकारच्या कारभाराला.! असे सवाल करत रोहित पवारांनी सरकारला जाब विचारला आहे.
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये काय आहे ?
रोहित पवारांनी एक्सवरुन ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावाने असलेले एक पत्र आहे. या पत्रात ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कर्मचारी श्री. रमेश दामोदर मुखेकर (वित्त व लेखा विभाग) यांनी साहिल महेश कदम या विद्यार्थ्यास विद्यापीठाच्या बी. कॉम. या अभ्यासक्रमाचे गुणपत्रक तसेच पदवी प्रमाणपत्र मिळवून देतो, असे सांगून सदर विद्यार्थ्याकडून रू.७०,०००/- (रूपये सत्तर हजार फक्त) गुगल पेद्वारे स्वीकारून व्हॉट्सअॅपवर संगणकाद्वारे तयार केलेल्या मूळ कागदपत्रांसारख्या भासणाऱ्या इमेजेस दिल्या, अशा आशयाची तक्रार विद्यापीठास प्राप्त झाली असल्याचं म्हटलं आहे.
पुरावेच लागतात ना?
अंधभक्तांनो घ्या आता पुरावे..!पेपर फोडायचा, प्रवेश मिळवायचा आणि तीन चार वर्षात डिग्री, एवढी उठाठेव कशाला?
महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते.
उच्च शिक्षणमंत्री आता तरी झोपेतून उठा…!
फडणवीस साहेब मानले राव तुमच्या सरकारच्या कारभाराला.!… pic.twitter.com/Mt7hPnFHQ8
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 29, 2026
या संदर्भात नमूद करण्यात येते की, सदर कर्मचारी हा विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कार्यरत नाही तसेच त्याने व्हॉट्सअॅपवर तयार करून दिलेली कागदपत्रे परीक्षा विभागाच्या अभिलेखांशी सुसंगत नाहीत, असे निदर्शनास आले. तसेच श्री. मुखेकर यांनी पैसे स्वीकारून सदर गैरकृत्यात सहभाग घेतल्याचे दिसून येते, असं नमूद करण्यात आलं आहे.
सदर विषयाचे गांभीर्य विचारात घेऊन श्री. मुखेकर यांना तात्काळ प्रभावाने विद्यापीठ सेवेतून निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची व्याप्ती विचारात घेता, सखोल तपासाच्या दृष्टीने चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे डॉ. राजेंद्र तलवारे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी रीतसर फिर्याद दिली आहे. पोलीस तपासात ज्यांचा या गैरकृत्यात सहभाग आढळून येईल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशा इशारा देण्यात आला आहे.
सदरचा गैरप्रकार श्री. मुखेकर यांनी परीक्षा विभागाशी संबंधित नसतांना तसेच परीक्षा विभागाच्या व्यवस्थेबाबतचे त्यांचे ज्ञान वापरून केलेला असल्याचे निदर्शनास आलेले असून यात व्यवस्थागत इतर कोणाचा सहभाग आहे का, ही बाब पोलीस तपासात स्पष्ट होईल. विद्यापीठाकडून जारी करण्यात येणाऱ्या परीक्षेच्या गुणपत्रिका व पदवीप्रमाणपत्रांमध्ये उच्च दर्जाच्या सुरक्षामानकांचा समावेश असल्यामुळे या संदर्भातील अफवांवर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.
२९ जुलै २०२६ रोजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या सहीने ही प्रेसनोट प्रसिद्ध करण्यात आल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.





