पुणे | शहरातील खड्डयांवरून आप आक्रमक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील रस्त्यांबाबत वारंवार तक्रारी देऊनही महापालिका प्रशासन काहीच कार्यवाही करत नाही. नवीन बनवलेले रस्ते एका वर्षात खराब होतात, बुजवलेले खड्डे चार ते पाच दिवसांतच खराब होत असून, महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमतानेच हे प्रकार सुरू आहेत.
त्यामुळे संबधितांवर कारवाई करण्यासह शहरातील रस्ते तत्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी करत आम आदमी पक्षाच्या वतीने सोमवारी सकाळी महापालिकेच्या पथ विभागाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले.
या वेळी पालिकेला जाग असे सांगत पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांची खुर्ची उचलून टेबलवर ठेवत त्याला पुष्पहार घालण्यात आला, तसेच प्रशासनाकडून कार्यवाही न झाल्यास चपलांचा हार घालण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
अचानक झालेल्या आंदोलनामुळे महापालिकेत गोंधळ उडाला, तर महापालिकेच्या सुरक्षा विभागालाही या आंदोलनाची कल्पनाच नसल्याचे समोर आले.
शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, महाराष्ट्र राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, महिला आघाडी अध्यक्ष भोसले, महासचिव सतीश यादव, अक्षय शिंदे, अमित मस्के, निलेश वांजळे, शंकर पोटघन, सुभाष करांडे, विकास चव्हाण, कानिफनाथ घोरपडे, किरण साठे,
अविनाश भाकरे, संतोष काळे, उमेश बागडे, अभिजीत गायकवाड, ऋषिकेश मारणे, गुणाजी मोरे, महिला आघाडी अध्यक्षा सुरेखा भोसले, शंकर थोरात या वेळी उपस्थित होते.


