Yograj Singh : टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि युवराज सिंह यांचे वडील योगराज सिंह (Yograj Singh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह आणि अश्लील कमेंटमुळे त्यांच्यावर चंडीगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योगराज सिंह (Yograj Singh) यांनी ‘लुख्खे’ या आगामी वेबसीरिजमध्ये महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या व्हिडिओ क्लिपचा एक भाग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका वकीलाने चंडीगडमधील सेक्टर ३६ पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ आणि ६२(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास सुरू आहे. Yograj Singh वकीलांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट म्हटले आहे की, वेबसीरिजमधील योगराज सिंह यांचे विधान इतके अश्लील आणि महिलांचा अपमान करणारे आहे की, त्याची पुनरावृत्तीही करता येत नाही. “जर योगराज सिंह स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेतात, तर त्यांनी अशी भाषा आपल्या आई आणि बहिणीसमोर वापरली असती तर कदाचित त्यांनीही लज्जेने मान खाली घातली असती,” असे वकील म्हणाले. त्यांनी केवळ योगराज सिंहांवरच नव्हे तर या मालिकेच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. योगराज सिंह यांच्याविषयी (Yograj Singh) योगराज सिंह (Yograj Singh) हे माजी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी भारताकडून १ कसोटी आणि ६ एकदिवसीय सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. कसोटीत १ आणि वनडेत ४ फलंदाजांना त्यांनी बाद केले आहे. क्रिकेट सोडल्यानंतर त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यांनी ‘भाग मिल्खा भाग’सह अनेक बॉलिवूड चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘लुख्खे’ वेबसीरिज (Yograj Singh) ही वेबसीरिज पंजाबमधील रॅप संस्कृती, ड्रग्ज, गुन्हेगारी, हिंसाचार आणि व्यवस्थेच्या अपयशावर आधारित आहे. या शोमध्ये रॅपर-गायक किंगने अभिनयात पदार्पण केले आहे. राशी खन्ना, पलक तिवारी, लक्षवीर सरन आणि शिवकांत सिंग परिहार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मालिकेचे दिग्दर्शन हिमांक गौर यांनी केले असून, ती ८ मे रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित झाली आहे. सध्या या प्रकरणात योगराज सिंह यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. व्हायरल क्लिपमुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असून, सोशल मीडियावरही या विषयावर चर्चा रंगली आहे.