Yograj Singh on Yuvaraj Singh Friends : भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे वडील आणि माजी भारतीय खेळाडू योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्यावर निशाणा साधला आहे. एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत योगराज यांनी युवराजच्या कथित मित्रांबद्दल बोलताना कोहली आणि धोनी यांच्यासह इतर सहकारी खेळाडूंवर गंभीर आरोप केले. त्यांनी या खेळाडूंना ‘पाठीत खंजीर खुपसणारे’ असे संबोधले. योगराज सिंग काय म्हणाले? योगराज यांना मुलाखतीत विचारण्यात आले की, २०१७ मध्ये एमएस धोनीनंतर विराट कोहली वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार झाला, तेव्हा तो युवराजसाठी काही करू शकला असता का? त्या काळात युवराज आणि कोहली यांच्यातील मैत्रीच्या चर्चा होत होत्या, परंतु युवराजला फार कमी संधी मिळाल्या आणि २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याला संघातून वगळण्यात आले. यावर योगराज यांनी सांगितले की, कोहली हा देखील युवराजचा खरा मित्र नव्हता. “यशाच्या शिखरावर कोणीही मित्र नसतो, तुम्ही एकटेच असता. पैसा आणि यश तिथे मित्र नसतात. मी हे युवराजला सांगितले होते,” असे ते म्हणाले. युवराजचा एकमेव खरा मित्र सचिन – योगराज यांनी पुढे दावा केला की, भारतीय संघात इतक्या वर्षांत युवराजचा एकमेव खरा मित्र हा महान फलंदाज सचिन तेंडुलकर होता. “युवराजचा एकमेव मित्र, जो त्याला खरोखर आवडतो, तो म्हणजे सर्वकालीन महान खेळाडू आणि माणूस म्हणूनही महान असलेला सचिन तेंडुलकर. तो एकमेव व्यक्ती आहे, जो युवराजला आपला भाऊ मानतो आणि सर्वांना यशस्वी पाहू इच्छितो,” असे योगराज म्हणाले. हेही वाचा – Lionel Messi : लिओनेल मेस्सी का झाला भावूक? सामन्यादरम्यान डोळ्यांत दिसले अश्रू, VIDEO होतोय व्हायरल युवराजच्या प्रतिभेपासून सर्वजण घाबरायचे – युवराजच्या प्रतिभेपासून सर्वजण घाबरायचे, असा आरोप करताना योगराज यांनी सर्व सहकारी खेळाडूंवर धोखा देण्याचा ठपका ठेवला. ते म्हणाले, “यश, पैसा आणि प्रसिद्धीच्या शिखरावर कोणीही मित्र नसतो. नेहमीच पाठीत खंजीर खुपसणारे लोक असतात. काही लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. युवराज इतका महान खेळाडू होता की, सर्वजण त्याच्यापासून घाबरायचे. कारण त्याला देवाने बनवले होते. धोनीसह सर्व खेळाडू त्याच्यापासून घाबरायचे, कारण तो त्यांची जागा घेईल, अशी भीती त्यांना वाटायची.”