सलग तिसऱ्यांदा योगी आदित्यनाथ ठरले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री !

मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातव्या क्रमांकावर

नवी दिल्ली : इंडिया टुडे ग्रुप आणि कार्वी इनसाइट्‌सने केलेल्या मूड ऑफ द नेशन (Mood of The Nation 2020) सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणात सलग तिसऱ्यांदा योगी आदित्यनाथ यांनी बाजी मारली असून पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री होण्याचा बहुमान पटकावला आहे. या सर्वेक्षणात योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. योगी आदित्यनाथ यांना एकूण 24 टक्के मते मिळाली आहेत. गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेच ही मते सहा टक्‍क्‍यांनी वाढली आहेत. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीवरुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असतानाही योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर लोकांनी समाधान व्यक्त केल्याचं दिसत आहे.

सर्वेक्षणानुसार, पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री हे भाजपा आणि कॉंग्रेसची सत्ता नसणाऱ्या राज्यांचे आहेत. गेल्या तीन सर्वेक्षणात सलग पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी चौथ्या क्रमांकावर घसरल्या आहेत. ममता बॅनर्जी यांना नऊ टक्के मते मिळाली आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 टक्के मते मिळाले असून ते दुसऱ्या आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी 11 मतांसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सात टक्के मतांसहित सातव्या क्रमांकावर आहेत.

दुसरीकडे सर्वेक्षणात नरेंद्र मोदी आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान ठरले आहेत. 44 टक्के लोकांनी नरेंद्र मोदी आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान असल्याचे मत नोंदवले आहे. दुसऱ्या क्रमांकावर अटलबिहारी वाजपेयी यांचा समावेश असून त्यांना 14 टक्के मते मिळाली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर 12 टक्‍क्‍यांसहित इंदिरा गांधी आहेत. जवाहरलाल नेहरु आणि मनमोहन सिंग यांना प्रत्येकी पाच टक्के मते मिळाली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.