Indapur News : योग ही शारीरिक कसरत नसून ती जीवन जगण्याची शास्त्रीय पद्धत: बाळासाहेब हरणावळ

इंदापूर: योग ही शारीरिक कसरत नसून ती जीवन जगण्याची शास्त्रीय पद्धत आहे. गुरुकुलमधून विद्यार्थी केवळ शैक्षणिक नव्हे तर मानसिक दृष्ट्याही सक्षम बनावेत, यासाठी हे उपक्रम गुरुकुल शिक्षण संस्थेत सातत्य पूर्ण चालवले जातील, अशी ग्वाही गुरुकुल विद्या मंदिर गोखळीचे संस्थापक बाळासाहेब हरणावळ यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील गोखळी येथील गुरुकुल विद्यामंदिर या शिक्षण संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थी शिक्षक यांनी योगसाधना केली. तसेच संस्थेच्या वतीने सातत्यपूर्ण अखंड योग संस्थेच्या विद्यार्थ्यांकडून करून घेतले जातील, असा संकल्प यावेळी संस्थापक बाळासाहेब हरणावळ यांनी व्यक्त केला.
पुढे मार्गदर्शन करताना संस्थापक हरणावळ म्हणाले, योग ही भारताची अमूल्य देणगी आहे. शरीर आणि मनाचा समतोल राखणाऱ्या योगसाधनेचा जागर शालेय शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या अध्ययनाबरोबर करणे गरजेचे आहे. मनाची व शरीराची शुद्धी याच योगाद्वारे होऊ शकते असे मतही बाळासाहेब हरणावळ यांनी व्यक्त केले.
यावेळी योग दिनानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व टोपी देऊन सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर योग दिनाचे आकर्षक पाश्वचित्र आणि विद्यार्थ्यांनी रंगवलेली रांगोळी लक्षवेधी ठरली. योग प्रशिक्षकांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन दिले. ताडासन, वृक्षासन, भुजंगासन आणि प्राणायाम अशा विविध योग प्रकारांचा सराव करून घेतला गेला.





