वाल्हे, – श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात काही प्रयोगशील ऊस उत्पादक शेतकरी एकरी उसाचे 100 टन उत्पादन काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करतात. यंदाही सुरू झालेल्या ऊस गाळप हंगामातही ही ऊस उत्पादनाची स्पर्धा सुरू आहे. सोमेश्वर साखर कारखान्याचे सभासद मांडकी (ता.पुरंदर) गावचे प्रयोगशील शेतकरी दीपक अनिल सावंत व जयंत अनिल सावंत यांनी या हंगामामध्ये एकरी 102 टनाचे उत्पन्न घेतले असल्याची माहिती, सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक विश्वास जगताप यांनी दिली. काळ्या मातीतले महानायक म्हणून सावंत बंधूं यांची नव्याने ओळख निर्माण झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे. अनेक प्रयोगशील शेतकरी यंदाही एकरी उसाचे शंभर टन उत्पादन काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करताना अढळून येतात. या स्पर्धेत शिरपेचात तुरा लावणारी कामगिरी सावंत बंधूंनी केली आहे.त्यांनी को- 86032 जातीच्या उसाचे उत्पन्न एकरी 102 टन घेतले. त्यांच्या गट क्रमांक 59 मधील दि. 22 नोव्हेंबर ते दि. 26 नोव्हेंबर या कालावधीत शिवारातील उसाची तोड गाळपासाठी करण्यात आली. त्यामध्ये सावंत यांनी ऊस उत्पादन वाढीचा केलेला विक्रम ऊस विकास विभागाने सर्वांच्या समोर आणला आहे. तो इतर ऊस उत्पादकांसाठी दिशादर्शक ठरणारा असल्याचे कृषी सहाय्यक नंदकुमार विधाते यांनी सांगितले. दरम्यान, आधुनिक पद्धतीने शेती केल्यानंतर शेतीचे उत्पन्न वाढते व शेती फायद्यामध्ये राहते हे या वरून सिद्ध झाले आहे. सावंत यांनी विक्रमी उत्पादन काढल्याबद्दल श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास जगतात, माजी संचालक मोहन जगताप, मानसिंग जगतात,पोलीस पाटील श्रीतेज जगताप, प्रविण जगताप, तेजपाल सणस, विश्वास जगताप,ओंकार जगताप,लोकेश जगताप, अरविंद जगताप,तुषार जगताप आदींनी सावंत बंधूचे अभिनंदन केले. दरम्यान,सावंत यांना मोलाचे सहकार्य शेतकरी कृषी सेवा केंद्र मांडकीचे माधव जगताप, शेतकरी मित्र शिवाजी मोरे,व सोमेश्वर कारखान्याचे अग्री ओव्हरशियर चंद्रकांत गायकवाड,कृषी पर्यवेक्षक माधवी नाळे,कृषी सहाय्यक नंदकुमार विधाते,महेंद्र साळुंखे, धनंजय निगडे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. संजीवनी मिळाली संशोधनात्मक झालेले काम शिवारात राबविल्यास एकरी शंभर नव्हे त्याही पेक्षा अधिक टनापर्यंत ऊस उत्पादन घेता येईल. यंदा 102 टन ऊस उत्पादन घेतल्याने एक प्रकारची संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे या यशस्वी प्रयोगाविषयी शेतकरी बांधवांना सांगणार आहे. तसेच एकरी 102 टन ऊस उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन, एकात्मिक खत व्यवस्थापन, पाण्याच्या काटेकोर नियोजन केले. फुटव्यांची संख्या एकरी 40 ते 45 हजार ठेवली, असे ऊस उत्पादक सावंत बंधू यांनी नमूद केले. यामुळे झाली उसाची जोमदार वाढ लागवडीसाठी हे साडेचार बाय दोन फुटाचे अंतर. आडसाली 86032 जातीच्या उसाची रोप लागण 30 दिवसानंतर 12/61 ह्यूमिकची आळवणी 40 दिवसांनी पहिला रासायनिक खतांचा ढोस दिला. 90 दिवासांनी मोठी भरणी केली. वेळोवेळी शेणखत, कोंबडखत व रासायनिक खते दिली सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मांडकी परिसरातील शाश्वत ऊस उत्पादनासाठी एकरी 102 टन ऊस उत्पादन घेणारे दिशादर्शक ठरणार आहे. -विश्वास जगताप, संचालक, सोमेश्वर साखर कारखाना