‘होय, नवी मुंबईतील बारच नाही तर रेस्टॉरण्टचा ही मालक मीच’

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी वानखेडे हे मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे मालक असून त्याचा परवाना वानखेडेंच्या नावे आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे. मात्र समीर वानखेडे यांनी मलिकांच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले आहे.
नवाब मलिका यांनी ट्विटरवर सद्गुरु रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत वानखेडेंवर निशाणा साधला. “समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे,” अशा कॅप्शनसहीत नवाब मलिक यांनी हा फोटो शेअर केला. मात्र वानखेडे यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. “आपण भारतीय महसूल सेवेमध्ये (आयआरएस) रुजू झाल्यापासून हा परवाना आपल्या नावे असल्याचे स्पष्ट केले आहे.
या परवान्यासंदर्भातील कायदेशीर हक्क हे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे देण्यात आले. “यात बेकायदेशीर असं काहीच नाहीय. मी सेवेमध्ये रुजू झालोय तेव्हापासून म्हणजेच २००६ सालापासून या बार आणि रेस्तराँरंटचा उल्लेख माझ्या वर्षीक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे. तसेच या परवान्याबद्दलचाही उल्लेख मी संपत्तीच्या हिशोबात मांडलाय. या उद्योगामधून मिळणाऱ्या कामाईचा सर्व उल्लेख मी प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केला,” असे वानखेडे म्हणाले आहे.
समीर वानखेडे यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना यास दुजोरा दिला आहे. ‘माझ्या नावावर बारचा परवाना असणं यात बेकायदेशीर काहीही नाही. २००६ साली सरकारी सेवेत येतानाच मी जी स्थावर मालमत्तेची माहिती दिली आहे, त्यात हे नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय, या व्यवसायातून येणारा सर्व नफा इन्कम टॅक्स रिटर्नमध्येही दाखवला जातो,’ असं त्यांनी म्हटलं आहे.





