Yerwada Murder – वैमनस्यातून तरुणावर पिस्तुलातून गोळीबार, तसेच कोयत्याने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री येरवडा परिसरात घडली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. गौरव गणेश तेलंगी (वय १८, सध्या रा. बिंडसर वस्ती, नऱ्हे, मूळ रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तौफीक शेख, समीर शिंदे, राजन दोरास्वामी (तिघे रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सयान निजामुद्दीन शेख (वय १८, रा. वैदुवाडी, इंदिरानगर, हडपसर) याने विश्रांतवाडी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी येथील मुख्य चौकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी (१४ एप्रिल) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौरव, त्याचे मित्र रवी कोळी, शाहरुख शेख, रेहान हे दुचाकीवरून विश्रांतवाडी भागात आले होते. येरवड्यातील पंचशीलनगर परिसरात त्यांनी दुचाकी लावली होती. आरोपींशी गौरवचा काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. विश्रांतवाडीतील कार्यक्रम संपल्यानंतर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गौरव आणि त्याचे मित्र पंचशीलनगर परिसरात लावलेली दुचाकी घेण्यासाठी निघाले असता, मागावर असलेल्या आराेपींनी येरवड्यातील काॅमर झोन आयटी कंपनीजवळील रस्त्यावर गौरवला गाठले. त्याच्यावर गोळीबार केला. मात्र, गोळी लागलीच नाही. त्यानंतर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी मध्यस्थी केल्यावर आरोपींनी त्यांनाही धमकाविले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गौरवला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संपतराव राऊत तपास करत आहेत.