शिरूर : शिरूर तालुक्यातील कवठे गावातील येमाई ही महाराष्ट्रातील हजारो कुटुंबीयांचे कुलदैवत आहे. भक्तगण या नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब या ठिकाणी गर्दी करत असतात. श्री येमाई देवी अनेक कुटुंबीयांचे कुलदैवत तर गावचे ग्रामदैवत आहे. महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे आराध्य दैवत कुलदैवत श्रद्धास्थान असणाऱ्या देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. उत्सव काळात श्री येमाई देवीच्या मंदिरात नऊ दिवस देवीची विविध रूपात जडावी सालंकृत पूजा बांधण्यात येते. यावेळी मंदिरात देवीसमोर पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात येते. देवीचे पारंपारिक ढोरके पुजारी, शिंदे गुरव परिवार यांच्याकडून देवीची नियमित पूजा केली जाते. तसेच देवीसाठी नित्यालंकारासह नवरात्र काळात उत्सवासाठी पारंपारिक दागिन्यांबरोबरच देवीला रोज नवीन नऊ दिवस नऊ विविध रंगाचे वस्त्र परिधान केले जाते. देवीचे नऊ दिवसातील नऊ रंगांच्या वस्त्रांचे मूर्तिमंत रूप डोळ्यात साठवण्या जोगे असते. या काळात रोज सकाळी सप्तशती वाचन, गोंधळ, आरती, महापूजा रोज सायंकाळी सप्तशती वाचन, आरती, पूजा, नैवेद्य गोंधळ असे कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून भाविक भक्त मुक्कामी हजेरी लावत असतात. यासाठी नाशिक पुणे या ठिकाणांवरून विशेष पुरोहित होमहवनासाठी बोलविले जातात. त्यांना ग्रामपुरोहीत जोशी कटुंबीय व गोरे कुटुंब मदत करत असतात. यावेळी गावातील गोंधळी, आराधी, भराडी हे पारंपारिक पद्धतीने आपला जागरण गोंधळ,भेदिक,कलगी तुरा यांचा कार्यक्रम देवीसमोर सादर करत असतात. कवठे येमाई गावापासून तीन किलोमिटर अंतरावर हे देवीचे मंदीर आहे. मंदिर सभोवती वृक्षारोपण केले असल्यामुळे येथील परीसर निर्सगरम्य बनला आहे. मंदिराच्या बाहेर जुन्या काळातील बारव आहे. मंदीराचा जीर्णोद्धार करून रंगरंगोटी करण्यात आली आहे. श्री येमाई देवी ट्रस्ट यांच्याकडून अनेक विकासकामे करण्यात आली आहेत व विकासकामे चालू आहेत. नवसाला पावणारी देवी म्हणून या मंदिरात भावीक दर्शनासाठी येत असतात. राज्यभरात भाविक मुक्कामी राहण्यास येत असतात. यासाठी येथे निवासस्थान बांधण्यात आले आहेत. नवरात्र उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. आसपासचे भावीक येथे पहाटे पायी चालत येऊन दर्शनासाठी गर्दी करताना दिसतात. जागरण गोंधळ, भजन, प्रवचन करून येथे हा उत्साह मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. या उत्सवासाठी, मंदिरावर विद्युत रोषणाई व सभोतालची स्वच्छता, रंगरंगोटी, करण्यात आली आहे. नवरात्रात अनेक शैक्षणीक सहली येथे असतात. दसऱ्याच्या दिवशी भक्तांची प्रचंड गर्दी होत असल्याने, वाहतूकीवर प्रचंड प्रमाणात ताण येत असतो. कवठे ते श्री यमाई मंदिर मार्ग एक वाहन बसेल इतकाच रुंदीचा असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी स्थानिक तरुण मदत करत असतात परंतु त्याच बरोबर महसूल विभाग, पोलीस प्रशासन यांनी सुद्धा मदत केली पाहिजे अशी अपेक्षा ग्रामस्थ करत आहे. नवरात्र काळात पहाटे पाचला देवीची गोंधळी समाजाकडून आरती, सकाळी ९ वाजता व संध्याकाळी ७ वाजता शिंदे गुरव ढोरकेभक्त यांच्या उपस्थितीत ओलांडा होत असतो. तसेच देवीची नियमित पूजाअर्चा व देवीला अभिषेक गोरेपाटील कुटुंबीयांकडून केला जातो. येमाई देवीची पूजा व अभिषेकाचा मान गोरे पाटील या कुटुंबीयांकडे आहे.ते ही सेवा मनोभावे करत आहेत. गेली अनेक वर्षे त्यांच्याकडे हा मान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तमाम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान, आराध्य दैवत, कुलदैवत असणाऱ्या कवठे येमाई ता.शिरूर येथील ग्रामदैवत श्री येमाई देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात शिरूर-मंचर रोडवर कवठे येमाई हे गाव असून गावच्या दक्षिणेस ३ कि. मी. अंतरावर निसर्गरम्य परिसरात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री येमाई देवी देवस्थान एक जागृत देवस्थान असून या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची मनोकामना,मनातील इच्छा पूर्ण होत असल्याने भक्त गणांची येथे नवस फेडण्यासाठी नेहमीच मोठी गर्दी होत असते. कवठे येमाई गावास ऐतिहासिक वारसा लाभलेला असून गावाजवळून वाहणाऱ्या घोडनदीच्या किनारी पुर्वी कवठे हे गाव वसलेले होते, अशी आख्यायिका आहे. कवठे येमाई गावचे वैभव असलेल्या श्री येमाई देवीच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून मंदिर परिसरास तीर्थक्षेत्राचा दर्जाही प्राप्त झाला आहे. देवीच्या मंदिर परिसरात सभोवताली शेकडो वर्षांपूर्वीचे मोठमोठे वाट वृक्ष, मंदिराच्या उत्तरेस पायऱ्या असलेली ऐतिहासिक बारव (विहीर), मंदिरातील प्रशस्थ गाभारा,समोरचा मोठा सभामंडप,देवालयाच्या सभोवताली तटबंदीचा वाडा,त्यास पूर्वेकडून व उत्तरेकडून असणारी भव्य प्रवेशद्वारे,मंदिरासमोर २ ऐतिहासिक घाट्या (घंटा) असून पूर्वेकडील महाद्वाराजवळ दोन ऐतिहासिक नगारे आहेत. मंदिराच्या आवारात तीन उंच दीपमाळी असून नवरात्र उत्सव व चैत्र पौर्णिमेस होणाऱ्या यात्रा उत्सवात त्या पेटविल्या जातात. देवीच्या दर्शनासाठी येथे मुक्कामी येणाऱ्या भाविकांच्या राहण्याच्या सोयीसाठी आवारातच खोल्या बांधलेल्या आहेत. देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस १५ फूट खोल दगडी बांधकामातील श्री महादेवाचे ऐतिहासिक मंदिर असून त्यातील दगडी पिंड व दगडी नंदी हे या मंदिराचे वैशिष्ठय आहे. याच ऐतिहासिक महादेव मंदिरातून ३ कि.मी. अंतरावर असणाऱ्या कवठे गावठाणातील राजवाड्यापर्यंत पूर्वी भुयारी मार्ग होता. धार, इंदोर, वणी ते दिंडोरीच्या पायथ्यापासून तसेच पुणे, मुंबई, नगर, नाशिक, जळगावसह संपूर्ण राज्यभरातून देवीचे भक्त दर मंगळवारी, नवरात्र उत्सव व चैत्र पौर्णिमेस होणाऱ्या यात्रा उत्सवात श्री येमाई देवीच्या दर्शनासाठी कुटुंबासह मोठ्या संख्येने येत असतात. देवीची पूजा गोरे पाटील करीत आहेत. दररोज सकाळी ८ व संध्याकाळी ६ वाजता देवीची नियमित आरती व ओलांडा या ठिकाणी होत असतो. विशेषेकरून भाविकांची यावेळी मोठी उपस्थिती,गर्दी होत असते. वर्षातील प्रत्येक पौर्णिमेस रात्री व आषाढ, श्रावण महिन्यातील मंगळवारी सायंकाळी गावातून श्री येमाई देवीच्या पालखीची सवाद्य मिरवणूक निघत असते. गावातील सर्वच भागातील वाड्यावस्त्यातील लोकांना या पालख्यांचा मान दिला जातो. नवरात्र काळात श्री येमाई देवीचा मोठा उत्सव येथे साजरा करण्यात येतो. होम – हवन, भजन व इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने साजरे करण्यात येतात.वार्षिक पिकपाण्याचा अंदाज घेण्यासाठी जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेस सायंकाळी मंदिरासमोर असणारी सुमारे १२५ किलोग्रॅम वजनाची मोठी दगडी गोटी १३ जणांच्या उजव्या हाताच्या मधल्या एकच बोटाच्या साहाय्याने उचलली जाते. हा मान पिढ्यानपिढ्या मुंजाळवाडी ग्रामस्थांना आहे. येथील श्री येमाई देवी देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असल्याने मंदिर परिसराचा कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे. कसे याल… कवठे येमाई ता. शिरूर येथील तीर्थक्षेत्र श्री येमाई देवी देवस्थान हे पुण्यापासून ७० कि.मी.शिरूर पासून २७ कि.मी. मंचरपासून ३५ कि.मी. तर राजगुरूनगर (खेड) पासून ४५ कि.मी. व कवठे येमाई गावातून ३ कि.मी. अंतरावर हे जागृत देवस्थान आहे.