येलदरी धरण 91.85% भरले; कोणत्याही क्षणी दरवाजे उघडतील, नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील येलदरी धरणात सध्या ९१.८५% पाणीसाठा असून, कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडले जाणार आहेत, अशी माहिती पूर्णा पाटबंधारे विभागाने दिली. नदीपात्रात कोणीही उतरू नये व जनावरे सोडू नये, असे आवाहन विभागाने केले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या येलदरी धरणात गत ६७ दिवसांत ३४६ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली. धरणाची एकूण साठवणक्षमता ९३४.४४० दशलक्ष घनमीटर असून, सध्या ८६१.३९३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. यातील जिवंत साठा ७३६.७२३ दशलक्ष घनमीटर आहे. मागील २४ तासांत १०.२४४ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली. यंदा जुलैअखेरीस मुसळधार पावसामुळे धरणात मोठी आवक झाली, ज्यामुळे पुढील वर्षाचा पाणीप्रश्न मिटला आहे.
येलदरी धरणातून हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत सिंचन व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. खडकपूर्णा धरणातून विसर्ग सुरू झाल्याने येलदरी १००% भरण्याच्या मार्गावर आहे. धरणाची पाणीपातळी ४६१.०५० मीटर आहे. पूर्णा नदीवरील खडकपूर्णा, येलदरी आणि सिद्धेश्वर ही तिन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.





