Year Ender 2025: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) २०२५ या वर्षात नोकरदार वर्गासाठी अनेक क्रांतिकारी बदल केले आहेत. पीएफशी संबंधित कामांसाठी आता कर्मचाऱ्यांना कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज उरली नाही. प्रोफाईल अपडेट, पीएफ ट्रान्सफर आणि पेन्शन पेमेंट यांसारख्या प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि स्वयंचलित (Automated) करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांचा वेळ वाचावा आणि कामात पारदर्शकता यावी, हा या बदलांमागचा मुख्य उद्देश आहे. १. प्रोफाईल अपडेट आता घरबसल्या: जर तुमचा ‘UAN’ आधारशी लिंक असेल, तर नाव किंवा जन्मतारीख बदलण्यासाठी आता कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. कर्मचारी ऑनलाइन पद्धतीने ही माहिती अपडेट करू शकतात. २. नोकरी बदलताच पीएफ आपोआप ट्रान्सफर: १५ जानेवारी २०२५ पासून लागू झालेल्या नवीन नियमानुसार, नोकरी बदलल्यावर पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी आता जुन्या किंवा नवीन कंपनीच्या मंजुरीची वाट पाहावी लागणार नाही. ही प्रक्रिया आता अधिक सुलभ झाली आहे. ३. डिजिटल जॉइंट डिक्लेअरेशन: UAN आधारशी लिंक असलेल्या सदस्यांसाठी ‘जॉइंट डिक्लेअरेशन’ प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल झाली आहे. केवळ ज्यांचे आधार लिंक नाही किंवा सदस्याचा मृत्यू झाला आहे, अशाच प्रकरणात कागदी फॉर्म द्यावा लागेल. ४. सेंट्रलाइज्ड पेन्शन सिस्टीम (CPPS): १ जानेवारी २०२५ पासून ईपीएफओने केंद्रीय पेन्शन पेमेंट सिस्टीम सुरू केली आहे. यामुळे पेन्शनधारकांना आता देशातील कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन घेता येईल. ‘PPO’ एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात ट्रान्सफर करण्याची कटकट आता संपली आहे. ५. अधिक पगारावर पेन्शनची सुविधा: ज्या कर्मचाऱ्यांचा पगार विहित मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांना आता अतिरिक्त योगदान देऊन वाढीव पेन्शन घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही प्रक्रिया आता अधिक स्पष्ट आणि पारदर्शक करण्यात आली आहे. ६. अवघ्या ३ ते ५ दिवसांत पैसे ट्रान्सफर: पूर्वी पीएफ ट्रान्सफरसाठी अनेक आठवडे लागायचे. मात्र, नवीन ‘ऑटोमेटेड ट्रान्सफर सिस्टीम’मुळे आता केवळ ३ ते ५ दिवसांत पीएफचे पैसे ट्रान्सफर होणार आहेत. ७. ‘पासबुक लाईट’ फीचर लाँच: पासबुक पाहण्यासाठी आता क्लिष्ट लॉगिन प्रक्रियेची गरज नाही. केवळ UAN आणि OTP टाकून कर्मचारी आपले पीएफ बॅलन्स तपासू शकतात. यासाठी ‘पासबुक लाईट’ हे विशेष फीचर सुरू करण्यात आले आहे. ८. पेन्शन पेमेंट पूर्णपणे डिजिटल: केंद्रीकृत प्रणालीमुळे पेन्शन थेट ‘NPCI’ प्लॅटफॉर्मद्वारे कोणत्याही बँक खात्यात जमा होईल. तसेच नवीन PPO आता UAN शी लिंक असल्याने डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करणे सोपे झाले आहे. ९. पीएफमधून १००% रक्कम काढता येणार: केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) घेतलेल्या निर्णयानुसार, आता पात्र सदस्य त्यांच्या पीएफ खात्यातील कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांच्या हिश्याची १००% रक्कम काढू शकतील. यापूर्वी बेरोजगारीच्या काळात टप्प्याटप्प्याने पैसे काढण्याचे निर्बंध होते, जे आता शिथिल झाले आहेत. १०. वन-टाइम एनरोलमेंट स्कीम: सामाजिक सुरक्षा वाढवण्यासाठी ईपीएफओने ही विशेष योजना आणली आहे. १ जुलै २०१७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जे कर्मचारी पीएफ कव्हरेजपासून वंचित राहिले होते, त्यांना या योजनेद्वारे पुन्हा प्रवाहात आणण्याची संधी नियोक्त्यांना देण्यात आली आहे.