175 मुले ठणठणीत : शून्य बालमृत्यू असलेले एकमेव शहर
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात करोनाचा उद्रेक वाढला आहे. असे असताना दिलासादायक बाब म्हणजे वायसीएम रुग्णालयात आतापर्यंत 175 बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे करोनाबाधित शहरांपैकी शून्य टक्के बालमृत्यू असलेले पिंपरी चिंचवड शहर हे राज्यात एकमेव आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयाच्या बालरोग विभागातील डॉक्टर व परिचारिकांच्या परिश्रमाचे संपूर्ण शहरात कौतुक होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मार्च महिन्यात करोनाबाधित रुग्ण आढळला. यावेळी महापालिका प्रशासनाच्या वतीने वायसीएम रुग्णालयात बालरोग करोना वार्डची सुरुवात केली. हा वॉर्ड 26 एप्रिल रोजी सुरू झाला. एप्रिलमध्ये 13 करोनाबाधित बालकांवर यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आले. त्यानंतर मे मध्ये 17, जून महिन्यात 102 तर जुलै महिन्यात 43 बालकांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये वय वर्ष 1 ते 12 वर्षापर्यंतच्या बालकांचा समावेश होता.
बालरोग विभाग प्रमुख डॉ. दिपाली अंबिके यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, लागण झालेल्या या बालकांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसत नव्हती, मात्र करोना पझिटिव्ह आल्यामुळे शासनाने दिलेल्या सर्व अटींचे पालन करून त्यांच्यावर उपचार केले. एप्रिलमध्ये सुरूवातीला बालकांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव आढळल्यानंतर 7 करोनाग्रस्त मुले बालरोग विभागात दाखल झाली होती.
रुग्णालयात गेल्या 100 दिवसांमध्ये 175 मुलांनी करोनावर मात केली. यामध्ये एकही मूल दगावले नाही. लहान मुलांची प्रतिकारक्षमता आईच्या दुधामुळेच वाढते. त्यात मूल आईच्या सानिध्यात राहिल्यास इन्फेक्शन वाढण्याची भीती कमी असते. आईपासून दूर ठेवल्यास बाळ अस्वस्थ होते आणि रडून रडून त्याची प्रतिकार क्षमता कमी होते. त्यामुळे दाखल झालेल्या 80 टक्के मुलांची आई त्यांच्यासोबत बालरोग विभागात होती. त्यामुळे मुलांसोबत मातावरही करोनाबाधित समजूनच औषध उपचार करण्यात आले.
पाच दिवसांच्या करोनाबाधित बाळला जीवनदान
गेल्या तीन महिन्यात 16, 12 आणि 5 दिवसांचे करोनाबाधित बालक दाखल झाले होते. नवजात शिशु विभागातून ही बालके दाखल झाल्यानंतर त्यापैकी दोघांच्या प्लेटलेट कमी झाल्या होत्या. इतक्या लहान बाळांवर उपचार करुन त्यांना करोनाच्या विळख्यातून मुक्त करणे डॉक्टर व स्टाफसाठी आव्हानात्मक कार्य होते. परंतु सर्वांच्या अथक परिश्रमांनी या बालकांवर यशस्वी उपचार करून त्यांना जीवनदान देण्याची किमया बालरोग विभागाने केली आहे.