पिंपरी (प्रतिनिधी) – महापालिकेच्या वायसीएममधील डॉक्टरांना झालेल्या धक्काबुक्की घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरांचे सुरक्षाकवच वाढविले जाणार असून याठिकाणी खासगी बाउन्सरची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये चार महिला व आठ पुरुष बाउन्सरचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल टिकवून ठेवण्यासाठी ही खासगी सुरक्षा तैनात केली जाणार आहे. याकरिता येणाऱ्या सहा लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव बुधवारी (दि.5) होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
महापालिकेचे वायसीएम रुग्णालय कोविड समर्पित आहे. याठिकाणी करोनाबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार केले जातात. याठिकाणी काम करणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना 25 आणि 27 जुलै या दोन दिवसांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून तसेच एका नगरसेवकाकडून रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्कीचे प्रकार घडले. त्यामुळे सोमवारी (दि.27) वायसीएममधील डॉक्टरांनी आंदोलन केले होते. कोविड काळात रुग्णसेवा खंडीत होऊ नये, याकरिता महापौर माई ढोरे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत, सुरक्षीत वातावरणात कामाची हमी दिली होती.
दरम्यान, पुढील दोन महिन्यांत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढणार असल्याचा महापालिका प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील आणखी दोन महिने वायसीएममध्ये करोनाबाधितांवर उपचार सुरु राहणार आहेत. या कालावधीत रुग्णांच्या नातेवाईकांकडून अशाप्रकारच्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा याठिकाणी काम करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर परिणाम होऊ नये, याकरिता केल्या जाणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात महापालिका प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान वायसीएमच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवरदेखील चर्चा करण्यात आली. त्यानुसार वायसीएममध्ये खासगी बाउन्सरची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार चार महिला व आठ पुरुष असे एकून 12 बाउन्सर नेमले जाणार आहेत. हे सर्व बाऊन्सर वायसीएमला तीनही पाळ्यांमध्ये अहोरात्र सुरक्षा देणार आहे. रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक अथवा त्रयस्त व्यक्तींकडून वायसीएममधील डॉक्टर अथवा कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होऊ न देण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
प्रत्येक बाउन्सरला 25 हजार रुपये मानधन
प्रोटेक्शन पावर बाउन्सर्स या खासगी ठेकेदार कंपनीकडून आठ तासांच्या प्रत्येक पाळीत एक महिला व तीन पुरुष बाउन्सर्स तैनात केले जाणार आहेत. तर प्रत्येक बाउन्सर्सला प्रति महिना 25 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. पुढील दोन महिन्यांकरिता या बाउन्सर्सची नेमणूक वायसीएममध्ये केली जाणार आहे.