“वायसीएम’ रुग्णालयात मानधनावर भरतीचा सुकाळ

मंजुरीसाठी प्रस्ताव : 60 पदांसाठी स्थायीत होणार शिक्कामोर्तब

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावरील अपुऱ्या मनुष्यबळाचे “विघ्न’ दूर होण्याची चिन्हे आहेत. विधानसभा आचारसंहितेच्या धसक्‍याने मानधनावर तज्ज्ञ डॉक्‍टरांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत विविध पदांची भरतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. निवड प्रक्रियेसह प्रतीक्षा यादीतील 60 पदांची भरती मानधन तत्त्वावर केली जाणार आहेत.

महापालिका प्रशासनाकडून याबाबतचा प्रस्ताव बुधवारी (दि. 11) होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. वायसीएम रुग्णालयातील 10 वैद्यकीय अधिकारीपदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात 29 वरिष्ठ व 63 कनिष्ठ निवासी पदे सहा महिने कालावधीकरीता नियुक्त करण्यासाठी महापालिकेने निवड प्रक्रिया राबविली होती. त्यात निवड झालेल्या 15 वरिष्ठ व 24 कनिष्ठ निवासी अशा 39 उमेदवारांच्या नियुक्तीस मंजुरीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

याखेरीज वायसीएम रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात स्टाफ नर्स, ब्लड बॅंक टेक्‍निशियन, ब्लड बॅंक कौन्सिलर, एमएसडब्ल्यु, डायलेसिस टेक्‍निशियन, डाटा एंट्री ऑपरेटर, फार्मासिस्ट, एक्‍स-रे टेक्‍निशियन, लॅब टेक्‍निशियन, पुरुष कक्ष मदतनीस, स्त्री कक्ष मदतनीस ही पदे सहा महिने कालावधीसाठी मानधनतत्त्वावर भरण्यात येणार आहेत. यापैकी 78 उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यापैकी 66 उमेदवार रुजू झाले. उर्वरीत 12 जागांपैकी प्रतीक्षा यादीतील विविध पॅरामेडीकल पदावर 11 उमेदवारांची निवड करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×