प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात जानेवारी ते डिसेंबर २०२५ या एक वर्षाच्या कालावधीत महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत एकूण ३ हजार ३१८ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. यासाठी महापालिकेकडून ९ कोटी २४ लाख ५३ हजार ९०० रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याअंतर्गत गरीब व गरजवंत रुग्णांना मोफत उपचार दिले जातात. महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर आणि सर्व यंत्रणा उपलब्ध असल्याने या योजना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालविल्या जातात. जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यांच्या कालावधीत एकूण ३ हजार ३१८ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये ६०८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर, इतर रुग्णांवर विविध प्रकारे उपचार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेत रुग्णाला एकही रूपया खर्च करावा लागणार नाही, याची काळजी रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे. वायसीएम रुग्णालयात २०१२ पासून महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना सुरू आहे. कोरोना महामारीमध्ये या योजनेअंतर्गत रुग्णालयात तब्बल ५ हजार ५०० रुग्णांना मोफत तसेच कॅशलेस पद्धतीने उपचार देण्यात आले होते. रुग्णालय व्यवस्थापन, शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याचे पुरवठादार आणि डॉक्टर यांच्या सुयोग्य नियोजनामुळे रुग्णांना उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यात महापालिकेला यश आले आहे. त्यामुळे शहरातीलच नाही तर राज्यातून येणाऱ्या गरजवंत रुग्णांनी महापालिका आणि रुग्णालयाचे कौतुक केले आहे. अस्थिरोग शस्त्रक्रिया यशस्वी ज्येष्ठ नागरिक घरात घसरून पडणे, लहान मुलांना खेळताना झालेल्या हाडांच्या इजा, वयोमानानुसार होणारी हाडांची झीज, अपघातात मोडलेली हाडे या प्रकारचे रुग्ण वायसीएम रुग्णालयात मोठ्या संख्येने असतात. या रूग्णांना अनेकदा शस्त्रक्रिया करावी लागते. या शस्त्रक्रियेसाठी म्हणजेच इम्प्लांट साठी काही वैद्यकीय वस्तूंची आवश्यकता भासते. महापालिकेने या वस्तू पुरविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवत एका ठेकेदाराची नेमणूक केली आहे. संबंधित ठेकेदारांनी सर्व वस्तू वेळेवर आणि उच्च दर्जाच्या पुरविल्याने रुग्णालयात अस्थिरोगावरील शस्त्रक्रिया शंभर टक्के यशस्वी झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.