Yavatmal Crime : धक्कादायक ! बाप्पाच्या प्रसादावरून झालेला वाद विकोपाला गेल्याने तरुणाची हत्या

यवतमाळ : यवतमाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये गणेशोत्सवात बाप्पाच्या प्रसादावरून झालेल्या वादातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. यवतमाळच्या आर्णी शहरातील संभाजीनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
काय घडले नेमके?
बादल टाले असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. आर्णी शहरातील संभाजीनगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात प्रसाद वाटप सुरू होता. त्यावेळी आरोपी आणि फिर्यादी दोघेही त्या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी आले होते. प्रसाद वाटपाचे काम सुरू असताना या दोघांमध्ये वाद झाला. त्यावरून आरोपी संतापला आणि त्याने बादल याला विटेने मारहाण केली. यामध्ये बादल गंभीर जखमी झाला.
यानंतर बादलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





