यवतमाळ-वाशिम : भावना गवळी शिवसेनेचा गड राखतील?

यवतमाळ हा विदर्भातला जिल्हा आहे. कापूस हे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख उत्पादन. तसे विणकाम, विडी, कागद, साखर, जिनिंग-स्पिनिंग आणि तेल उद्योगही येथे आहेत. यवतमाळ जिल्ह्यात 16 तालुके आहे. या संपूर्ण भागात पाणीटंचाईची समस्या आहे. यवतमाळ-वाशिम मतदारसंघ 2008 मध्ये अस्तित्वात आला. यवतमाळ जिल्ह्यातील 4 आणि वाशिम जिल्ह्यातील 2 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यातील चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. एका ठिकाणी शिवसेना आणि एका ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत.

या लोकसभा मतदारसंघाच्या सध्याच्या खासदार भावना गवळी यांनाच शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिली आहे. माजी खासदार पुंडलिकराव गवळी यांच्या त्या कन्या आहेत. जबरदस्त जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. त्याच जोरावर त्यांनी 4 वेळा या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली आहे. 1999च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसचे नेते अनंतराव देशमुख यांचा पराभव करून पहिल्यांदा विजय मिळवला. त्यानंतर त्या सातत्याने या मतदारसंघातून निवडून येत आहेत. खासदारकीच्या आपल्या 20 वर्षांच्या काळात भावना गवळी यांनी या मतदारसंघात विकासकामेही मोठ्या प्रमाणावर केली आहेत. त्यामुळे चार वेळा खासदार असल्यामुळे आता दुसऱ्या कुणाला तरी संधी द्या, अशी मागणी त्यांच्याबाबतीत झालेली नाही.

भावना गवळी यांच्या उमेदवारीबाबत त्यांना कुणाची स्पर्धा नव्हती. याचा अर्थ शिवसेनेत त्यांच्याबाबतीत सगळेच आलबेल आहे असा नाही. महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि भावना गवळी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. किंबहुना त्यांच्यातील वाद शिवसेनेच्या हायकमांडची डोकेदुखी आहे. गेल्या वर्षी डिसेंबरपासून सर्वच पक्षांच्या दृष्टीने निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. तेव्हापासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी प्रत्येक पक्ष करत असल्याचे दिसत होते. त्यामुळे प्रत्येक पक्षातील गटतट समोर आले. शिवसेनेतील गटबाजीही समोर आली. 2014च्या निवडणुकीत भावना गवळींना संजय राठोड यांची साथ लाभली होती. पण यावेळी राठोड यांचे गवळींशी बिनसले आहे. वाशिम जिल्हा म्हणजे गवळींचे होमपिच. राठोड वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गवळी यांना विरोध करण्याचे सर्व प्रयत्न राठोड यांनी केले आहेत. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गवळी यांना निवडून आणण्याची जबाबदारी संजय राठोड यांच्यावर टाकली आहे. आता राठोड यांना गवळींसाठी नाही तर उद्धव ठाकरेंसाठी इथे गवळींच्या बाजूने काम करावे लागेल. त्यामुळे गवळींची बाजू भक्कम होऊ शकते.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात राळेगाव, यवतमाळ, दारव्हा-दिग्रस आणि पुसद हे चार विधानसभा मतदारसंघ आणि वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि कारंजा हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघात कुणबी, बंजारा, आदिवासी, दलित, मुस्लीम हे प्रमुख समाजघटक आहेत. मात्र बंजारा आणि कुणबी या समाजाचे वर्चस्व आहे.

इथून शिवसेनेच्या खासदार निवडून येत असल्या तरी यवतमाळ जिल्हा हा कॉंग्रेसचा गड मानला जातो. कॉंग्रेसचे माणिकराव ठाकरे आता निवडणूक रिंगणात आहेत. पण अंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसतो की काय अशी शंका येण्याइतपत कॉंग्रेसची इथे अवस्था बिकट आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भावना गवळी यांनी कॉंग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांचा पराभव केला होता. पण याहीवेळी मोघेंना येथून उमेदवारी हवी होती. त्यांच्याबरोबर जीवन पाटील, डॉ. टी. सी राठोड आणि आमदार हरिभाऊ राठोड हे इच्छुकांच्या यादीत होते. इतकेच नाही तर उमेदवार जाहीर होईपर्यंत सगळे दिल्लीत ठाण मांडून होते. पण प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सुरुवातीपासूनच माणिकराव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरला आणि त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली. पण आता यामुळे इतर सगळेच जण नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान ठाकरे आणि कॉंग्रेस दोघांनाही पेलावे लागणार आहे.

त्यातच यावेळी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारही निवडणूक़ रिंगणात आहे. त्याचा फटका कॉंग्रेसच्या मतपेटीला बसू शकतो. वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. प्रविण पवार हे उमेदवार आहेत. त्यांच्या उमेदवारीने मतांचे विभाजन होण्याची शक्‍यता आहे. प्रा. पवार हे बंजारा समाजातील आहेत. गवळी आणि ठाकरे दोघेडी कुणबी समजातील आहेत. त्यामुळे कुणबी समाजाची मते या दोघांत विभागली जाण्याची शक्‍यता आहे. आदिवासींची साथ कॉंग्रेसला मिळेल ही देखील आशा नाही. बंजारा समाजातील एकगठ्ठा नाही तरी बहुतांश मते पवार यांना मिळतील असे वंचित बहुजन आघाडीला वाटते. अर्थात जातीच्या आधारावर निवडणूक लढवली तर. या मतदारसंघात निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढली जाते यावर त्याचा निकाल अवलंबून आहे. या भागातील कापूस उत्पादक शेतकरी सर्व बाजूंनी गांजलेला आहे. अजूनही या लोकसभा मतदारसंघात शेतकरी आत्महत्येची समस्या संपलेली नाहीत. गेल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागातील शेतकऱ्यांना दिलेली आश्‍वासने पूर्ण झालेली नाहीत म्हणून इथल्या शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. विकासकामेही धिम्या गतीने सुरू आहेत. त्यामुळे इथले मतदार कुणाच्या बाजूने मतदान करतात याची उत्सुकता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.