Yavatmal News : यवतमाळ हादरलं ! खड्ड्याने घेतला चौघांचा बळी

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहरात रेल्वे स्टेशन परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाण्यात बुडून चार अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मृत मुलांमध्ये रीहान असलम खान (वय 13), गोलू पांडुरंग नारनवरे (वय 10), सोम्या सतीश खडसन (वय 10) आणि वैभव आशीष बोधले (वय 14) यांचा समावेश आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना आज, 20 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी घडली. रेल्वे स्टेशनजवळील पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते.
या खड्ड्यात पोहण्याच्या उद्देशाने चारही मुले पाण्यात उतरली. मात्र, पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. स्थानिक नागरिकांनी ही घटना पाहताच तात्काळ खड्ड्यात उतरून मुलांना बाहेर काढले. प्राथमिक उपचारानंतर मुलांना तातडीने यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दु:खद घटनेने दारव्हा आणि परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिक आणि मृत मुलांचे कुटुंबीय यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.





