Yavatmal News : यवतमाळमधून बिष्णोई गँगच्या सदस्याला अटक

यवतमाळ : अमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत असताना यवतमाळ एलसीबीच्या पथकाला मोठी माहिती मिळाली. आंतरराष्ट्रीय गुन्हेगार लॉरेन्स बिष्णोई आणि बिन्नी गुज्जर गँगचा सक्रिय सदस्य यवतमाळात असल्याचे गोपनीय खब-याकडून सांगण्यात आले.
पोलिसांनी याची पडताळणी करून शहरातील जांब रोडवरील दांडेकर ले-आऊट येथून त्या सदस्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर राजस्थान पोलिसांनी २५ हजार रोख बक्षीस ठेवले होते. भूपेंद्रसिंग ऊर्फ भिंडा जरनैलसिंग(३५) रा. ग्राम अहारना खुर्द पोस्ट. मेहटियाना जि. होशियारपूर पंजाब असे अटक करण्यात आलेल्या गँगस्टरचे नाव आहे.
त्याने २०२३ मध्ये राजस्थानातील बाडनेर येथे हरिपालसिंग ऊर्फ रिंकू (रा. गंगानगर) याचा खून केला होता. त्या गुन्ह्यात तो पसार असल्याने राजस्थान पोलिसांनी भूपेंद्रसिंग याच्यावर २५ हजारांचे रोख बक्षीस ठेवले होते. भूपेंद्रसिंग हा लॉरेन्स बिष्णोई गँग, बिन्नी गुज्जर गँग यांच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणून काम करत होता.





