प्रभात वत्तसेवा यवत – आम्ही अशी परिस्थिती पुन्हा येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेऊ, तसेच गावामध्ये शांतता व सुव्यवस्था राखू, असे ग्वाही यवत येथील गावकऱ्यांनी पोलिसांना दिली.दौंड तालुक्यातील यवत येथे दोन गटांत झालेल्या वादविवादच्या घटनेमुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी यांच्या आदेशाने जमावबंदी केली होती. पाच दिवसांची जमावबंदी आदेश दिला होता. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येऊ नये, यासाठी यवत पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. जमावबंदी हटवल्यानंतर यवत पोलिसांनी पदाधिकारी, गावकऱ्यांसमवेत शांतता बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर यावर मार्गदर्शन करीत गावात सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले. यावेळी गावकऱ्यांनी सामाजिक सलोखा राखण्याचे आश्वासन दिले.यवत येथील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येणार नाही, याची पूर्णपणे खबरदारी यवत पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली. (दि.६) रात्री उशिरा जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचा आदेश मागे घेतला. त्यामुळे यवत गावातील नागरिक व्यापारी यांची दुकाने सुरू होऊन पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर आली. मात्र, या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठा ताण आला होता. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यवत पोलीस स्टेशन येथे शांतता बैठकीचे आयोजन (दि.७) केले होते. यावेळी दौंड पोलीस उपविभागाचे उपविभागीय अधिकारी बापूराव दडस, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, पीएसआय विजय कोल्हे, पीएसआय किशोर वागज, ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांना उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस व पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी मार्गदर्शन केले. सरपंच समीर दोरगे यांनी आभार मानले. आपल्या मुलाच्या मोबाइलबाबत सतर्क राहा.. देशमुख म्हणाले की, आपण मुलांना मोबाइल देतो, त्या मोबाईलचा वापर ते शैक्षणिकदृष्ट्या किती करतात याची काळजी आपण घेतले पाहिजे. मोबाइलचा चुकीचा वापर तर आपला मुलगा करीत तर नाही ना, याची देखील दखल सर्व पालकांनी घेणे गरजेचे आहे. पुन्हा अशा घटना नको- दडस.. उपविभागीय पोलीस अधिकारी दडस म्हणाले की, गावामध्ये शांतता बिघडवण्याचे काम ज्यांनी केले. त्यांच्यावर कायद्याने आम्ही गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गावांमध्ये पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची सर्व ग्रामस्थांनी काळजी घ्यावी कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. पुन्हा गावांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची सर्वांनी दखल घ्यावी. असा काही प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.