Yathindra Siddaramaiah : सिद्धरामय्या 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील; यतींद्र सिद्धरामय्या यांनी केला दावा

म्हैसूर : आपले वडील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील असा दावा कर्नाटकातील काँग्रेसचे विधान परिषद सदस्य यतींद्र सिद्धरामय्या यांनी शनिवारी केला. पत्रकारांशी बोलताना यतींद्र यांनी उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे उच्चपद भूषवू शकतात या कथित नोव्हेंबर क्रांतीबद्दलच्या चर्चेला निराधार असे म्हणत फेटाळून लावले.
नोव्हेंबर क्रांती ही केवळ अटकळ आहे. आमच्या पक्षात अशी कोणतीही चर्चा नाही, असे यतींद्र यांनी येथे पत्रकारांना सांगितले. त्यांचे वडील त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील का असे विचारले असता ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. मे २०२३ मध्ये काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर, मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात तीव्र स्पर्धा निर्माण झाली.
पक्षाने अखेर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. त्यावेळी ठरलेल्या सूत्रानुसार शिवकुमार अडीच वर्षांनी पदभार स्वीकारतील अशा तडजोडीच्या बातम्या आल्या होत्या. तथापि, पक्षाने कधीही असे काही ठरले असल्याच्या वृत्ताला अधिकृतपणे पुष्टी दिलेली नाही.





