वीसगाव खोरे, – रावडी (ता.भोर) येथील वासुदेव बळवंत फडके विद्यालयात यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन कर्नावड केंद्राच्या केंद्रप्रमुख अंजना वाडकर व वासुदेव बळवंत फडके विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धांमध्ये कर्नावड केंद्रातील आठ शाळांनी सहभाग घेतला. लोकनृत्य कबड्डी, खोखो, लेझीम, भजन व वैयक्तिक स्पर्धा पार पडल्या. बक्षीस वितरण समारंभ धुव्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर, केंद्रप्रमुख अंजना वाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. राजीव केळकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. स्पर्धा पार पाडण्यासाठी जयवंत जाधव, सुरेश खोपडे, दिलीप चिकणे, स्नेहल देशमाने, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले. सविता तनपुरे व शरद दळवी यांनी सूत्रसंचालन केले.