यशवंतराव भांगरे यांचे अकोले तालुक्यासाठी पायाभूत काम, त्यांचे स्मरण कायम राहील – शरद पवार

अकोले (प्रतिनिधी) – सामान्य शेतकरी व आदिवासींच्या हिताची जपणूक करणाऱ्या दिवंगत आमदार यशवंतराव भांगरे यांनी सतत अकोले तालुक्यातील जनतेच्या हिताचे राजकारण केले. अगस्ती सहकारी साखर कारखाना, अकोले तालुका दूध संघ व अकोले तालुक्यातील शैक्षणिक संस्था उभारणीला योगदान देऊन त्यांनी तालुका विकासाचे पायाभूत काम केले. त्यांचे अकोले तालुक्या बरोबरच आम्हालाही त्यांचे स्मरण होत राहील.असा निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपारी दिला.
दिवंगत आमदार यशवंतराव भांगरे यांच्या ३९ व्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व शेतकरी मेळाव्याचे आयोजन आज शेंडी भंडारदरा येथे करण्यात आले होते. श्री पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ हे होते.
तर व्यासपीठावर मंत्री प्राजक्त तनपुरे ,आमदार माणिकराव कोकाटे ,आमदार गोटीराम पवार,आमदार डॉक्टर किरण लहामटे, शारदा लगड, अजय फटांगरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले ,राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, कपिल पवार, सौ सुनीता भांगरे, ज्येष्ठ नेते दशरथ सावंत,मधुकर राव नवले, अशोक राव भांगरे, अमित भांगरे,दिलीप भांगरे, संघराज रुपवते, व उत्कर्षा रुपवते आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार यांनी आपल्या भाषणात कैलासवासी यशवंतराव भांगरे यांच्या कुटुंबाचा व त्यांच्या आमदारकीचा आढावा घेताना १९५२,५७, ६२, ६७, ७२, ७८ आणि १९८0 च्या निवडणुकांचा संदर्भ देऊन यशवंतराव भांगरे हे सातत्याने आपल्याला ज्येष्ठ असल्याने मार्गदर्शक राहिले आणि त्यांच्या ठाई तालुक्यातील शेती सुधारणा, पाण्याची जागृकता जी होती ती आजही जनतेमध्ये मला दिसून येते अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्याच्या राजकीय विचारसरणीचा संदर्भ देताना त्यांनी अकोले तालुका हा डाव्या विचारसरणीचा होता व जवळपास जिल्ह्याचे नेतृत्व ही डाव्या विचारसरणीशी निगडीत होते याची आठवण करून देऊन शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री पद भूषविले.त्या कालावधीमध्ये मात्र लोकांना विकासाचे स्वप्न दाखवले आणि नंतर नगर जिल्ह्याचा राजकीय विचाराचा बदल होत गेला. या प्रसंगाची त्यांनी आवर्जून आठवण करून दिली आणि या विचारसरणीचा पगडा आजही तालुक्यांमध्ये टिकून असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पर्यटन पूरक कळसुबाई हरिश्चंद्र गड रिंग रोड रस्त्याच्या बांधणीसाठी आठ दिवसात सार्वजनिक बांधकाम बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत अशोकराव भांगरे,अमित भांगरे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्यासमवेत बैठक लावू. अकोले तालुका हा पर्यटनाच्या आणि विकासाच्या दृष्टीने देशात अग्रेसर राहील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. ग्रामविकास खात्याकडून तालुक्याच्या रस्ते, पर्यटन विकास कामांसाठी निधी देऊ असे त्यांनी जाहीर केले.
आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी पावसाळ्यात भरपूर पाऊस पण उन्हाळ्यात मात्र लोकांच्या डोळ्यात पाणी अशी स्थिती असल्याचा आपला वास्तव दाहक अनुभव सांगून धरणांमध्ये तालुक्यात बुडीत बंधारे बांधले जावेत अशी मागणी केली. तोलार खिंड, रिंग रोड बांधणी, तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय आणि एमआयडीसी या प्रश्नांना चालना मिळण्याची गरज स्पष्ट केली. आणि इंग्रजी राजवटीनंतर गेल्या चाळीस वर्षात आलेली राजवट ही इंग्रजी राजवट होती अशी शेरेबाजी करून यांच्यावर त्यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या वर नाव न घेता टीकास्त्र सोडले.
या कार्यक्रमाचे संयोजक,दिवंगत आमदार यशवंतराव भांगरे यांचे चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांनी वीस हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आणणाऱ्या आदिवासी भागातील उपसा सिंचन योजना बंद असल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. हे काम निकृष्ट होण्याला टक्केवारी कारणीभूत असे सांगून मागील लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. या योजना पूर्ववत चालू झाल्या पाहिजेत.याकडे पवार यांचे लक्ष वेधले. आणि आपला मुलगा अमित हा उच्च शिक्षीत असून त्याला आदिवासींच्या सेवेसाठी अर्पण करीत आहे असे जाहीर केले.
युवा नेते अमित भांगरे यांनी पॉवर प्रेझेंटेशन करून यशवंत यूथ फेडरेशनच्या उभारण्याची माहिती उपस्थितांना दिली व काश्मीर खोऱ्याच्या धर्तीवर भंडारदरा धरणामध्ये फ्लोटिंग मार्केटिंग’ची कल्पना मांडली.पिचड यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी यावेळेस तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेताना अशोक राव भांगरे यांना राज्य स्तरावर काम करण्याची संधी शरद पवार यांनी द्यावी अशी थेट मागणी केली.
तत्पूर्वी श्री पवार यांचे मुरशेत येथे अशोकराव भांगरे व त्यांच्या कुटुंबाबरोबर आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी हेलिपॅड वर स्वागत केले. त्यानंतर त्यांनी श्री पवार यांनी मुरशेत गावाची पाहणी केली.माहिती घेतली आणि त्यानंतर ते कार्यक्रमस्थळी आले.तेव्हा त्यांचे घोषणाबाजीत स्वागत झाले. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांना त्यांनी हात वर करुन अभिवादन केले.
प्रास्ताविक करून विनोद हांडे यांनी आभार मानले. तर सूत्रसंचालन सुहास वाळुंज यांनी केले. यावेळी शाहीर मुकुंद भोर यांनी शरद पवार यांच्या वर असलेला पोवाडा गायला. कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती. यावेळी पवार यांचा बैल जोडी चे प्रतीकात्मक स्टॅच्यू देऊन सत्कार करण्यात आला.तर इतर मान्यवरांनाही संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पुतळा उभारणीचा चौकार ठोकण्याचा आपल्याला ४८ तासात सुखद अनुभव आल्याचा शरद पवार यांनी उल्लेख केला. काल सकाळी यशवंतराव चव्हाण यांचा कोल्हापूर येथे, तर शिराळ्या चे
माजी आमदार यांचा शिराळा येथे, काल रात्री मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचा व आज यशवंतराव भांगरे यांच्या पुतळ्याचा अनावरणाचा चौकार ठोकण्याचा सुखद अनुभव आला अशी अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
१९७२ सा ली निवडून आलेल्या यशवंतराव भांगरे यांना मंत्री होण्याबाबत पक्षश्रेष्ठींनी विचारणा केली. तेव्हा आपण अल्पशिक्षित आहोत. मंत्रीपद नको. असे सांगून तालुक्याच्या विकासासाठी आपल्याला सहकार्य करा असा आग्रह त्यांनी पक्ष श्रेष्ठी आणि तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे धरण्याची आठवण पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी या वेळेस जाहीरपणे सांगित ली.
शरद पवार यांनी आपण लोणी येथे विद्यार्थी असताना नववीला मित्रांच्या सोबत लोणी – रंधा फॉल -भंडारदरा असा सायकल प्रवास केल्याची आठवण सांगितली आणि तेव्हापासून भंडारदर्याचे आपल्याला कायम आकर्षण राहिले अशी आठवण त्यांनी सांगितली.
लग्नानंतर भाषणे करण्याची कोपरगाव श्रीरामपूर या भागातली आठवण सांगून पाण्याचा प्रश्न या निमित्ताने आपल्या देखत लग्नाच्या नंतरच्या भाषणात मांडण्याची कार्यकर्त्यांची पाण्या बाब तची जागृ क भूमिका आहे असे सांगताना ही मिस्किल आठवण त्यांनी करून दिली व आजही त्यांची भाषणे होतात का अशी विचारणा केली.





