Yashashri Munde : राजकारणात आणखी एका मुंडेंची एन्ट्री ! यशश्री मुंडेंनी घेतला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय

बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्या यशश्री मुंडे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यांनी वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत आपला अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता राजकारणात आणखी एका मुंडेंची एन्ट्री झाली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यशश्री मुंडे या वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत.
वैद्यनाथ बँक ही अनेक दशक गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबाच्या ताब्यात राहिली आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे आता एकत्र आल्यानंतर ही निवडणूक फारशी कठीण जाणार नसल्याचे खरं असलं तरी यानिमित्ताने यशश्री मुंडे यांनी देखील बँकेच्या निवडणूक रिंगणामध्ये उडी घेतली. महिला वर्गामध्ये खासदार प्रीतम मुंडे यांचा बिनविरोध निघण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची होणार?
निवडणुकीचे अर्ज 14 जुलै रोजी छाननीसाठी घेतले जाणार असून, 15 ते 29 जुलैदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे. यानंतरच निवडणुकीचे स्वरूप स्पष्ट होईल. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 10 ऑगस्ट रोजी मतदान आणि 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडत आहे. यापूर्वी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्र येऊन बिनविरोध यश मिळवले होते. यंदाही दोघे एकत्र येण्याची शक्यता आहे.
17 जागांसाठी 71 अर्ज
सर्वसाधारण मतदारसंघातील 12 जागांसाठी 52 अर्ज दाखल झाले आहेत. अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी 4 अर्ज, भटक्या विमुक्त जाती-जमाती (विमाप्र) च्या एका जागेसाठी 4 अर्ज, इतर मागासवर्गीय (ओबीसी) साठी एका जागेसाठी 6 अर्ज, आणि महिलांसाठी राखीव दोन जागांसाठी 5 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता आहे.
कोण आहे यशश्री मुंडे?
यशश्री मुंडे या पेशाने वकील असून, त्यांनी काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठाकडून ‘प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट’ म्हणून गौरव प्राप्त केला आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांनी राजकारणात पदार्पण केले आहे. त्यामुळे त्यांचा पुढील राजकीय प्रवास कसा असणार आहे? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.





