‘यारियां 2’ चित्रपट अडचणीत; पंजाबमध्ये ‘या’ कारणमुळे टीमवर FIR दाखल

मुंबई – शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (SGPC) च्या तक्रारीवरून पंजाब पोलिसांनी शुक्रवारी मीझान जाफरीच्या आगामी चित्रपट ‘यारियां 2’ च्या निर्मात्यांवर गुन्हा दाखल केला. चित्रपटातील एका गाण्याच्या दृश्यावर समितीने आक्षेप घेतला आहे. ज्यामध्ये जावेद जाफरी यांचा मुलगा मीजानच्या कमरेवर कृपाण दिसत आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमृतसर पोलिसांनी मीझान जाफरी, दिग्दर्शक विनय सप्रू आणि राधिका राव आणि निर्माता भूषण कुमार यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे.
यारियां 2: भारतीय दंड संहिता (IPC) कलम 295-A (कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून त्याच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण कृत्य) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
याआधी बुधवारी, शीख समन्वय समितीच्या सदस्याने जालंधर जिल्ह्यात आयपीसीच्या याच कलमांतर्गत मीझान जाफरीच्या ‘यारियां 2’ च्या टीमविरुद्ध आणखी एक एफआयआर दाखल केला.
SGPC सचिव प्रताप सिंह म्हणाले की, बिगर शीख अभिनेत्याने ‘गात्र कृपाण ‘ (शीख धर्माचे प्रतीक) नेऊन शीख तत्त्वे, प्रतिष्ठा आणि जीवनशैली दुखावली आहे. अमृतसर पोलिसांनी ई-डिव्हिजन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. “हे गाणे अजूनही यूट्यूबवर उपलब्ध आहे…फक्त कृपाण संपादित करून अस्पष्ट केले गेले आहे, परंतु गात्रा (किरपाण ठेवण्यासाठी वापरला जाणारा कापडाचा पट्टा) शाबूत आहे,” जे चित्रपट निर्मात्यांच्या हेतूवर गंभीर प्रश्न उपस्थित करते.




