Rohit Pawar : कुस्तीची स्पर्धा मल्लांसाठी की नेत्यांसाठी: रोहित पवारांचा खोचक सवाल

पुणेः महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निर्णायावरून महाराष्ट्रातून अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या निर्णयावर आणि एकूणच महाराष्ट्र केसरी स्पर्धा याबाबत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वादाचं ‘मोहोळ’ उठलेली अहिल्यानगरमधील कुस्तीची स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठी असा खोचक सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
या स्पर्धेतील काही नियम अजब-गजबच होते, अनेक मल्लांना संधीही मिळाली नाही. शिवाय माजी महाराष्ट्र केसरी पैलवानांना कोणताही मानसन्मान न मिळाल्याने त्यांना अवमान सहन करावा लागला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि यंदाच्या स्पर्धेचा अंतिम निर्णय याबाबत रोहित पवार यांनी अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले आहेत.
केवळ राजकीय नेत्यांचीच या स्पर्धेवर छाप असल्याने या नेत्यांसाठी अनेक कुस्त्यांच्या वेळाही बदलल्या. एकूणच काय तर ही स्पर्धा कुस्तीची आणि पैलवानांनी चेष्टा करणारी होती, असा दावा रोहित पवारांनी केला आहे. कुस्तीतील पारदर्शकता, आदरभाव, निष्पक्षपणा आणि खिलाडू वृत्तीच ‘चितपट’ झाल्याचे चित्र दुर्दैवाने अवघ्या महाराष्ट्राला उघड्या डोळ्यांनी बघावं लागलं असल्याचे ते म्हणाले. अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून दिली आहे.
वादाचं ‘मोहोळ’ उठलेली अहिल्यानगरमधील कालची कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठी, असा प्रश्न निर्माण होतो. या स्पर्धेतील काही नियम अजब-गजबच होते, अनेक मल्लांना संधीही मिळाली नाही, शिवाय माजी महाराष्ट्र केसरी पैलवानांना कोणताही मानसन्मान न मिळाल्याने त्यांना अवमान सहन…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 3, 2025
अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यातील झालेल्या राड्यानंतर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच रोहित पवारांनी तर कर्जत जामखेडमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने परवानगी दिली तर पुढच्या महिन्यादच महराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यार असल्याचे सांगितले आहे. पण हे कसं शक्य आहे असा प्रश्न देखील विचारला जात आहे.
कर्जत जामखेडमध्ये भव्य कुस्तीचा आखाडा?
पैलवानांना न्याय देणारी खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा’ अन्यायाला थारा न देणाऱ्या माझ्या मतदारसंघात कर्जत-जामखेडच्या पवित्र भूमीत घेण्याचे नियोजन आहे. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखालील ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे’ने परवानगी दिली, तर पुढील महिन्यातच मार्चअखेर ‘महाराष्ट्र केसरी’चा कर्जत-जामखेडच्या भूमीत भव्य असा आखाडा भरवण्यात येईल.. आणि ही स्पर्धा ‘कुणालातरी जिंकवण्यासाठी’ नसेल तर या स्पर्धेत गुणवत्तेवर जिंकणाऱ्या पैलवानालाच मानाची गदा मिळेल, याची खात्री देतो, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे.




