आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट ! ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कारवाईची केली मागणी

नवी दिल्ली – भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग आणि कुस्तीपटूंचा संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाही. नुकतीच आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे समजते. बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी गृहमंत्री शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत ब्रिजभूषण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
समोर आलेल्या माहितीनुसार, काल रात्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटूंनी आपले गाऱ्हाणे देशाच्या गृहमंत्र्यांसमोर मांडले. कुस्तीपटूंनी गृहमंत्र्यांकडे ब्रिजभूषण यांच्या विरोधात लवकरच आरोपपत्र दाखल करण्याची विनंती केली, परंतु सध्या कोणताही निर्णय झालेला नाही.
जंतरमंतरवर महिनाभर निदर्शने
अल्पवयीन विनेशसह अनेक महिला कुस्तीपटूंनी WFI अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या सर्वांनी कारवाईच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर महिनाभर आंदोलन केले.जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग केल्याचा आरोप करून हटवले होते. हे कुस्तीपटू संसदेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते आणि बॅरिकेड तोडून पुढे जात होते, असे पोलिसांनी सांगितले.
जंतरमंतरच्या बाहेर फेकल्यानंतर कुस्तीपटूंनी हरिद्वारला जाऊन त्यांची ऑलिम्पिक पदके गंगा नदीत टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक शेतकरी नेत्यांच्या विनंतीवरून त्यांनी हा निर्णय मागे घेत काही दिवसांची मुदत दिली.





