कृष्णकुंज भोवती करोनाचा विळखा

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आणखी एका चालकाला करोनाची लागण झाली असतानाच एकूण 7 कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजभोवती करोनाचा विळखा वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. करोनाने थेट कृष्णकुंजवर धडक दिल्याने मनसैनिकही काळजीत पडल्याचे पाहायला मिळत आहे.
सर्वात आधी राज ठाकरे यांच्या घराबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांपैकी 3 सुरक्षा रक्षकांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर त्याचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजमध्ये घरकाम करणाऱ्या सेवकालाही करोनाचा संसर्ग झाला. यानंतर राज ठाकरे यांच्या दोन चालकांनाही करोनाची लागण झाली. आता पुन्हा एकदा आणखी एका चालकाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यासह राज ठाकरेंच्या आजूबाजूला करोना संसर्ग झालेल्या लोकांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 2 वाहनचालकांना याआधीच करोनाची लागण झाली होती. आता पुन्हा एका चालकाला संसर्ग झाल्याने एकूण 3 वाहनचालकांना करोना संसर्ग झाला आहे. वाहनचालकांवर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.





