हुश्श! दुकाने उघडणार; सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत सुरू राहणार सर्व व्यवसाय

* पीएमपी, उद्याने, मंगल कार्यालये, सांस्कृतिक कार्यक्रम बंदच
* दुपारी तीननंतर संचारबंदी
पुणे : तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शहराचे अर्थचक्र पुन्हा रुळावर येणार आहे. शहरातील मॉल आणि शॉपिंग सेंटर्स वगळता इतर सर्व व्यापारी आणि व्यावसायिक दुकाने उद्यापासून उघडण्यात येणार आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 या वेळेत ही दुकाने सुरू राहणार आहेत. पुढील दहा दिवसांसाठी हा निर्णय घेतला असून दहा दिवसांनंतर शहरातील करोना स्थितीचा फेरआढावा घेऊन निर्बंधांचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले.
असे आहेत नवीन नियम
* अत्यावश्यक सेवांची दुकाने सातही दिवस सुरू राहतील
* सर्व बॅंका सर्व दिवस सुरू राहतील
* अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत
* रेस्टॉरंट, बार, हॉटेल फक्त घरपोस सेवा पूर्वीच्या नियमानुसार सुरू राहतील
* सर्व प्रकारच्या ई- कॉर्मससेवा सुरू राहतील
* दुपारी तीननंतर नागरिकांना केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच बाहेर पडण्यास मुभा
* मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहतील
* बाजार समिती, कृषीची दुकाने सुरू राहणार
पीएमपी बंदच
शहरात सर्व दुकाने उघडणार असली तरी, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली पीएमपी केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच असणार आहे. शहरातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी, पीएमपीने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षात घेता, मोठी गर्दी होऊन शहरात पुन्हा रुग्णवाढीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पीएमपी आणखी काही काळ बंद ठेवण्यात येणार असल्याचे महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले. तसेच उद्याने, मंगल कार्यालये, सार्वजनिक, सामाजिक कार्यक्रम, तसेच गर्दीची ठिकाणेही बंद ठेवण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील निर्बंध आहे तसेच
महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असणारे निर्बंध 15 जूनपर्यंत कायम राहणार आहे. यानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत आठवडाभर सुरू राहतील. यात किराणा, दूध, फळ, भाजीपाला, मिठाई, बेकरी, चिकन-मटण, मासे, कृषी उत्पादने व पूरक व्यवसाय यांची दुकाने सुरू ठेवता येतील. मात्र, जिल्ह्याबाहेर कोणासही जाता येणार नाही. तसेच जिल्ह्याबाहेरून कोणासही येता येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने सोमवारी काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.





