नगर (प्रतिनिधी) – शहरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मनपा प्रशसनाने आणखी 3 ठिकाणी मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर झाले आहेत. सावेडीतील बालिकाश्रम रस्ता, सिव्हील हडको, तर कोहिनूर मंगल कार्यालय परिसराचा समावेश आहे. अत्यावश्यक सेवा वगळता 28 मार्चपर्यंत विविध निर्बंध लागू करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिली.
नगर शहरात मायक्रो कंन्टेन्मेंट झोनची संख्या आता सहा झाली आहे. बालिकाश्रमरोडवर सुडके मळ्याचा भाग, सिव्हिल हडकोत गणेश चौक आणि कोहिनूर मंगल कार्यालयाजवळ जयश्री कॉलनीचा भाग यांचा मायक्रो कंन्टेन्मेंट झोनमध्ये समावेश आहे.
या कालावधीमध्ये या सूक्ष्म कंटेन्मेंटमधील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहतील. कंन्टेन्मेंट झोनमधील अत्यावश्यक सेवेसाठी उपायुक्त यांच्या नेतृत्वाखाली पथक कार्यरत राहील. कँन्टेन्मेंटमधील अत्यावश्यक सेवेसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येईल. रहदारीसाठी खुल्या असलेल्या मार्गावर येणार्या-जाणारे यांची तपासणी होईल. कंटेनमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तू या महापालिकेतर्फे पुरवल्या जातील. त्यासाठी यंत्रणा उभी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बँकिंग सुविधा संबंधित बँक व्यवस्थापनातर्फे पुरवल्या जातील. कंन्टेन्मेंट झोनला पोलीस बंदोबस्त आहे, तसे पत्र तोफखाना पोलिसांना दिले आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, या भागातील रहदारी आणि वाहने वापरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यावर संबंधितावर कायदेशीर कारवाई होईल.