जिल्ह्यात बाधितांची दिवसांतील संख्या 358
पुणे – शहरातील निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. मात्र, त्याचवेळी एकाच दिवसात तब्बल 317 नवे करोनाबाधित आढळले. जिल्ह्यात एका दिवसांत 41 बाधित सापडले. हा आतापर्यंतचा एकाच दिवसातील उच्चांक ठरला आहे. तर, दिवसभरात 14 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
डॉ. नायडू रुग्णालयात नमुने तपासणीतील 247 बाधित व्यक्ती सापडले आहेत. तर ससून रुग्णालयातील 9 आणि खासगी रुग्णालयातील 35 जणांचा समावेश आहे. शहरातील बाधितांची संख्या 4 हजार 398 वर गेली आहे. सध्या 1 हजार 786 बाधितांवर उपचार सुरू असून, त्यामध्ये नायडू आणि त्याअंतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये 1 हजार 134, ससून रुग्णालयात 154 तर खासगी रुग्णालयात 498 जणांवर उपचार सुरू आहेत.
14 बाधितांचा मृत्यू
मागील 24 तासांत शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या 12 बाधितांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दि. 19 आणि 20 रोजी प्रत्येकी एक मृत्यू झालेल्या दोघांचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्यामुळे आज दिवसभरात एकूण 14 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये 5 महिला आणि 9 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील वय वर्षे 33 ते 48 वयोगटातील चार, 50 ते 72 वयोगटातील 7 आणि 80 ते 93 वयोगटातील 3 जणांचा समावेश आहे. यातील बहुतांश व्यक्तींची अन्य आजारांची हिस्ट्री होती.