पिंपरी | चिंता मिटली ! पवना धरण ९१ टक्के भरले

पवनानगर, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील अनेक गावांची आणि पिंपरी-चिंचवड शहरवासियांची तहान भागविणारे पवना धरण गुरूवारी सकाळी ९१ टक्के भरले. पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात पावसाचा जोर कायम असून धरणात पाण्याची आवक सुरूच असल्याने सोमवारी धरणाचे सर्व दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
दुपारी दोन वाजता धरणाचे सहाही दरवाजे उघडून सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये १८०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच जलविद्युत केंद्रातून विद्युतगृहाद्वारे १४०० क्युसेक विसर्ग सुरू असल्याने एकत्रित ३२०० क्युसेक विसर्ग सध्या नदीपात्रात होत असल्याची माहिती पवना धरण पूर नियंत्रण कक्षाने दिली आहे.
नागरिकांना खबरदारीचा इशारा –
पवना धरणाच्या पाणी पातळीत आणि येव्यामध्ये होणारी वाढ विचारात घेता धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी हा विसर्ग करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी अथवा जास्त करण्यात येईल.
त्यामुळे पवना नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. कुणीही नदीपात्रात उतरू नये, नदीमधील पाण्याचे पंप, नदीकाठची शेतीची अवजारे आणि जनावरे योग्य स्थळी घेऊन जावीत, अशा सुचना नागरिकांना देण्यात आल्या असून खबरदारी घेत जलसंपदा विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




