मराठी दाम्पत्याला चिरडणारा मिहीर शहा कुठंय ? सुरत की गुवाहाटीला संजय राऊतांचा थेट सवाल

Worli Hit And Run । मागील काही दिवसांपासून हिट अँड रनच्या अनेक घटना समोर आल्या. यातच मुंबईतील वरळीत हिट अँड रनची घटना घडली. भरधाव कारने कोळी दाम्पत्याला उडवल्याने यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिचा पती जखमी झाला आहे. या कारमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर होता असा आरोप होत आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजेश शहा हे पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. याप्रकरणावर आता ठाकरे गटाचे नेते आमदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांनी थेट सवाल विचारला आहे ते म्हणाले,’मुंबईत हिट अँड रन करुन पळालेला मिहीर शहा सुरतमध्ये आहे की, गुवाहटीमध्ये असा थेट सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच, एका मराठी महिलेला दारूच्या नशेत गाडीखाली चिरडून हा कोणी मिहीर शाह मुंबई पोलिसांच्या हातातून सुटतो कसा? असाही प्रश्न संजय राऊतांनी विचारला आहे.
संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जहरी टीका केली आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी आणि त्याचे वडील यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मला असं कळालं त्यांचे व्यावसायिक संबंधही आहेत. त्यांच्या पक्षाचे ते उपनेते आहेत. पोलिसांनी त्यांना अटक कशी केली. पोलिसांनी त्यांना अटक करुन मोठा गुन्हा केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला खून केल्यानंतर अटक कशी होऊ शकते.”
ते पुढे म्हणाले,’मुख्य आरोपी कुठे आहे, फरार आहे ना त्यांचा मुलगा. एका मराठी महिलेला दारूच्या नशेत गाडीखाली चिरडून हा कोणी मिहीर शाह मुंबई पोलिसांच्या हातातून सुटतो कसा? कुठे गेलाय तो, सूरत की, गुवाहाटी? कुठे ठेवलंय त्याला सूरतला की, गुवाहाटीला लपवलंय? याचा खुलासा मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांनी करायला हवा.’ असं संजय राऊत म्हणाले.





