Jaywant Wadkar | Worli Hit and Run Case : पूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या वरळी हिट अँड रन अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला अखेर मुंबई क्राईम ब्रांचकडून अटक करण्यात आली आहे. त्याला शहापूरमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मिहीर शाहाची आई आणि बहिणीलादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यांच्याबरोबर आरोपीला मदत करणाऱ्या 12 जणांनाही मुंबईच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. यानंतर आता मिहीर शाहाची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेवर आता अभिनेते जयवंत वाडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयवंत वाडकर हे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी या महिलेचे काका आहे. या अपघात प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वाडकर यांचे डोळे पाणवले. तसंच या प्रकरणातील आरोपीला आमच्या ताब्यात दिलं पाहिजे, असं संतप्त प्रतिक्रिया जयवंत वाडकर यांनी दिली आहे. जयवंत वाडकर यांना अश्रू अनावर यावेळी बोलताना जयवंत वाडकर म्हणाले की, “अशा लोकांना आमच्या ताब्यात दिलं पाहिजे. लोकांच्या हातात दिलं पाहिजे. आपण म्हणतो की कायदा हातात घ्यायचा नाही. माझा भाऊजी सांगतोय की गाडी थांबव- गाडी थांबव… पण त्याने ऐकलं नाही. तो दोन ते तीन किलोमीटर तीला फरफटत नेलं. शेवटी तिला घेण्यासाठी माझ्या भाऊजीला टॅक्सी करून जावं लागलं, असं जयवंत वाडकर यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले, ‘मी दवाखान्यात गेलो नव्हतो. पण नातेवाईक तिथं होते. तिला बघायला बोलवलं तेव्हा सगळे हादरले. तिची तशी अवस्था बघवत नव्हती माझ्या भावाला कर चक्कर आली. इतकं विकृत कुणी कसं असू शकतं. उंदीर आडवा आला तरी आपण गाडी थांबवतो. मग एका महिलेला पाहून तुम्ही थांबत नाही म्हणजे काय? बोनेटवर असणारी व्यक्ती पाहून तुम्ही थांबत नाही, हे किती निर्दयीपणाचं लक्षण आहे, असं जयवंत वाडकर म्हणाले. हे सगळं सांगताना जयवंत वाडकर गहिवरले. त्यांना अश्रू अनावर झाले. नेमकं काय घडलं? ॲट्रिया मॉलजवळील एक कोळी दाम्पत्य प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा मच्छी आणण्यासाठी ससून डॉक येथे गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना पहाटे 5.30 च्या सुमारास कारने या दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नवऱ्याचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. मात्र महिलेचा पती बाजूला पडला तर, महिलेला चालकाने फरफटत नेले. यात महिला गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरला होता. आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर वरळी हिट अँड रन प्रकरणात 1,735 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. न्यायालयाने या प्रकरणी मिहिर शाहचे वडील राजेश शाह यांना जामीन मंजूर केला. 15 हजार रुपयांच्या तात्पुरत्या रोख रकमेवर राजेश शाह यांना शिवडी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तसेच चालक राजऋषी बिडावत याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.