छत्रपती शिवरायांचा जगातील सर्वांत उंच पुतळा जुन्नरमध्ये

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नरमध्ये शिवरायांचा जगातील सर्वांत उंच पुतळा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी येथे दिली. पुतळ्याचे काम एका वर्षाच्या आत पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुजरातमध्ये नर्मदातीरी उभारण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या “स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या धर्तीवर शिवाजी महाराजांचा पुतळादेखील भव्यदिव्य असणार आहे. हातात तलवार असलेला हा पुतळा ब्रॉन्झ धातूमध्ये मुंबई येथे तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी जे.जे स्कूल ऑफ आर्ट्स या नामांकित संस्थेत काम करण्याचा अनुभव असणाऱ्या ज्येष्ठ शिल्पकाराची निवड करण्यात आली आहे. राज्यासह देशालाही गर्व वाटेल अशा आणखी तीन घोषणा 29 सप्टेंबर रोजी करणार आहे, असे सोनवणे म्हणाले.
ट्रस्टच्या माध्यमातून असणार काम
ही संकल्पना स्वतःची असल्याने इतर कोणावरही आर्थिक भार न टाकण्याचा निर्णय सोनवणे यांनी सुरुवातीला घेतला होता. परंतु मित्र आणि सहकाऱ्यांच्या आग्रहामुळे “श्रीमंत योगी स्मारक ट्रस्ट’ ची स्थापना करण्यात आली आहे. पुतळ्यासह येथे शिवकालीन इतिहास जागवण्याचे काम ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.





