इंदापूर : इंदापूर तालुका आता द्राक्षाचे आगार म्हणून पुढे आला आहे. या भागातील शेतकर्यांनी द्राक्ष वेलींच्या म्युटेशनचा आधार घेत स्वतःच काळ्या द्राक्षाच्या वाणांची निर्मिती केली आहे. हे वाण लवकरच तयार होणारे असून शेतकर्यांची त्याला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. आजच्या स्थितीचा विचार केल्यास इंदापूर व माळशिरस तालुक्यातील द्राक्ष जगात सर्वात महागडी द्राक्ष गणली जात आहे. याचे सर्व श्रेय द्राक्ष बागायतदारांना जात आहे. या भागातील द्राक्ष काढणी हंगामाला सुरुवात झाली असून द्राक्षाच्या प्रतिप्रमाणे एका किलोस 135 ते 170 रुपये दर मिळत आहे. समाधानकारक दर मिळत असल्याने द्राक्ष बागायतदार समाधानी दिसत आहे. मागील पाच वर्षांपासून वातावरणातील बदल, अवेळी पाऊस, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय द्राक्ष उत्पादन स्थिती व बाजारभाव इ. कारणांमुळे हवालदिल झालेला द्राक्ष बागायतदार अपार मेहनतीच्या जोरावर उभारी घेताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका व सोलापूर मधील माळशिरस तालुक्यामधील जिद्दी शेतकरी द्राक्ष बागांमधील अडचणींवर मात करताना दिसत आहे. या तालुक्यांमध्ये काळ्या रंगाच्या द्राक्षाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीवर काळ्या द्राक्षांची लागवड केली आहे. या भागातील द्राक्ष 100 ते 120 दिवसांत तयार होत असल्याने बर्याच बागायतदारांचा कल ऑगस्ट व सप्टेंबर फळ छाटणीकडे असतो. यासंदर्भात माहिती देताना, महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे राजेंद्र वाघमोडे यांनी सांगितले की, फळबागायतीमध्ये तरुण सुशिक्षित शेतकरी उतरल्याचे दिसत आहे. कृषी संशोधन केंद्राच्या शिफारशींचा ते तंतोतंत अवलंब करतात. इंदापूर व माळशिरस भागातील द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष शेतीमधील सुधारणांसाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉ. संजय सावंत, डॉ. रामहरी सोमकुंवर तसेच सध्याचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. कृषी शास्त्रज्ञ व अनुभवी द्राक्ष बागायतदारांच्या मदतीने या इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकर्यांनी, उत्कृष्ट आकार व चवीची द्राक्ष बनविली आहे. देशामध्ये गवगवा होत असलेल्या पेटंटेड व नॉन पेटेंटेड वाणांपेक्षा या भागातील शेतकर्यांना आहे. म्युटेशन पद्धतीच्या आधाराने वाढविलेल्या काळ्या रंगाचे द्राक्ष वाण निश्चितच सरस ठरतील यात शंका नाही. -राजेंद्र वाघमोडे, महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र