World Politics: हंगेरीत मोठी राजकीय उलथापालथ! विक्टर ओर्बन यांचा 16 वर्षांचा सत्तेचा किल्ला ढासळला; पीटर मॅग्यार विजयी
World Politics: भारत-हंगेरी व्यापार: दोन्ही देशांतील व्यापार सुमारे १ अब्ज डॉलरच्या आसपास आहे. भारत प्रामुख्याने यंत्रसामग्री, औषधे आणि रसायने हंगेरीला निर्यात करतो.

World Politics: युरोपातील हंगेरी देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या १६ वर्षांपासून सत्तेत असलेले दिग्गज राष्ट्रवादी नेते आणि पंतप्रधान विक्टर ओर्बन यांना निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. हंगेरीच्या ‘तिस्झा’ (Tisza) पार्टीचे तरुण आणि लोकप्रिय नेते पीटर मॅग्यार यांनी ओर्बन यांच्या सत्तेला सुरुंग लावत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ओर्बन यांचा हा पराभव केवळ हंगेरीसाठीच नाही, तर त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठीही मोठा धक्का मानला जात आहे.
१६ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा शेवट –
निवडणूक निकाल स्पष्ट होताच विक्टर ओर्बन यांनी आपला पराभव स्वीकारला असून पीटर मॅग्यार यांचे अभिनंदन केले आहे. सुमारे सर्वच जागांची मतमोजणी पूर्ण झाली असून, मॅग्यार यांच्या तिस्झा पक्षाने संसदेत दोन तृतीयांश बहुमत मिळवण्याकडे कूच केली आहे. भ्रष्टाचार आणि ढासळती अर्थव्यवस्था या मुद्द्यांवरून मॅग्यार यांनी ओर्बन यांच्या विरोधात रान उठवले होते, ज्याला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, युरोपला दिलासा –
विक्टर ओर्बन हे डोनाल्ड ट्रम्प यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. ट्रम्प यांनी निवडणुकीदरम्यान त्यांना जाहीर पाठिंबाही दिला होता. मात्र, आता ओर्बन सत्तेबाहेर गेल्यामुळे ट्रम्प यांच्या युरोपातील एका महत्त्वाच्या मित्रपक्षाची साथ सुटली आहे. दुसरीकडे, युरोपीय महासंघाच्या (EU) कामकाजात वारंवार अडथळे निर्माण करणाऱ्या ओर्बन यांच्या पराभवामुळे युरोपातील इतर नेत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
पीटर मॅग्यार यांचा ‘आझाद’ हंगेरीचा नारा –
विजयी झाल्यानंतर समर्थकांशी संवाद साधताना पीटर मॅग्यार म्हणाले की, “आज आपण सर्वांनी मिळून हंगेरीला ओर्बन यांच्या राजवटीतून मुक्त केले आहे.” मॅग्यार यांनी त्यांच्या प्रचारात भ्रष्टाचाराचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला होता. तसेच हंगेरीतील ढासळलेली आरोग्य व्यवस्था आणि महागाई यावर त्यांनी भर दिला. याउलट, ओर्बन यांनी “हंगेरीला युक्रेन युद्धात ओढले जाईल” अशी भीती दाखवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, जो पूर्णपणे अपयशी ठरला.
Heartiest congratulations to Mr. Péter Magyar and the Tisza Party on your resounding election victory. India and Hungary are bound by deep-rooted friendship, shared values and enduring mutual respect. I look forward to working closely with you to further strengthen our bilateral…
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन –
हंगेरीतील या मोठ्या परिवर्तनानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटर मॅग्यार आणि त्यांच्या पक्षाचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत पंतप्रधान मोदी म्हणाले, “पीटर मॅग्यार आणि तिस्झा पक्षाच्या शानदार विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भारत आणि हंगेरीचे संबंध दीर्घकाळापासून मजबूत आणि मैत्रीपूर्ण राहिले आहेत, जे परस्पर आदर आणि सामायिक मूल्यांवर आधारित आहेत. दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आम्ही एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.”
पंतप्रधानांनी पुढे विश्वास व्यक्त केला की, भारत आणि युरोपीय महासंघातील धोरणात्मक भागीदारीमुळे दोन्ही देशांच्या जनतेच्या प्रगतीसाठी आणि कल्याणासाठी नवीन संधी उपलब्ध होतील.
हंगेरी देशाबाबत थोडक्यात –
हंगेरी हा मध्य युरोपातील एक देश आहे.
क्षेत्रफळ व लोकसंख्या: हंगेरीचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ९३,०३० चौ.किमी. आहे. २०२६ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या सुमारे ९५ लाख आहे.
२०२६ निवडणूक निकाल: नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पीटर मॅग्यार यांच्या ‘तिस्झा’ (Tisza) पक्षाने १९९ पैकी १३८ जागांसह दोन-तृतीयांश बहुमत मिळवले आहे. तर व्हिक्टर ओर्बन यांच्या ‘फिडेझ’ (Fidesz) पक्षाला ५५ जागा मिळाल्या आहेत.
शेजारील देश: हंगेरीच्या सीमा ऑस्ट्रिया, स्लोव्हाकिया, युक्रेन, रोमानिया, सर्बिया, क्रोएशिया आणि स्लोव्हेनिया या देशांना लागून आहेत.
धर्म: येथे प्रामुख्याने ख्रिश्चन (कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट) धर्माचे लोक आहेत.
भारत-हंगेरी व्यापार: दोन्ही देशांतील व्यापार सुमारे १ अब्ज डॉलरच्या आसपास आहे. भारत प्रामुख्याने यंत्रसामग्री, औषधे आणि रसायने हंगेरीला निर्यात करतो.





