World Inequality Report 2026: भारतामध्ये उत्पन्न आणि संपत्तीची असमानता विक्रमी स्तरावर पोहोचली असल्याची धक्कादायक माहिती ‘वर्ल्ड इनइक्वालिटी रिपोर्ट २०२६’ मधून समोर आली आहे. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील (नॅशनल इनकम) ५८% हिस्सा केवळ शीर्ष १०% श्रीमंत लोकांच्या हातात एकवटला आहे. याच्या उलट, देशातील खालच्या ५०% लोकसंख्येला या राष्ट्रीय उत्पन्नापैकी केवळ १५% हिस्सा मिळतो. संपत्तीची असमानता अधिक चिंताजनक – उत्पन्नासोबतच संपत्तीच्या बाबतीतही ही असमानता अधिक गंभीर आहे. देशातील शीर्ष १०% श्रीमंत लोकांकडे एकूण संपत्तीचा ६५% हिस्सा आहे, तर शीर्ष १% लोकांकडे जवळपास ४०% संपत्ती एकवटलेली आहे. रिपोर्टनुसार, भारतातील प्रति व्यक्ती सरासरी वार्षिक उत्पन्न (PPP नुसार) ₹६.५६ लाख आहे. दुसरीकडे, शीर्ष १०% लोकांकडे प्रति व्यक्ती सरासरी ₹१०.५८ कोटी पेक्षा अधिक संपत्ती आहे. तर, तळात असलेल्या ५०% लोकांकडे प्रति व्यक्ती सरासरी फक्त ₹६.८८ लाख एवढीच संपत्ती आहे. विशेषतः, देशातील शीर्ष ०.००१% (सुमारे ५६,००० लोक) लोकांकडे प्रति व्यक्ती ₹१०५८ कोटींहून अधिक संपत्ती असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. राष्ट्रीय उत्पन्नातील ५८% हिस्सा शीर्ष १०% लोकांकडे, तर संपत्तीतील ६५% हिस्सा शीर्ष १०% लोकांकडे आहे. महिला श्रम सहभाग दरात मोठी घसरण – या रिपोर्टमध्ये रोजगाराच्या बाबतीतही महिलांच्या स्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. भारतात महिला श्रम सहभाग दर (Female Labour Participation Rate) केवळ १५.७% आहे. याचा अर्थ, देशात १०० पुरुषांच्या तुलनेत केवळ १५.७ महिलांकडेच रोजगार आहे आणि गेल्या दशकात या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. जागतिक स्तरावर महिलांना एकूण श्रम उत्पन्नातील (लेबर इनकम) केवळ २५% हिस्सा मिळतो. असमानता असलेल्या देशांमध्ये भारत अग्रस्थानी – जागतिक स्तरावरही असमानता मोठी आहे, पण भारत या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेनंतर सर्वात जास्त असमानता असलेल्या देशांपैकी एक आहे. जगात शीर्ष १०% लोकांकडे ७५% संपत्ती आणि ५३% उत्पन्न आहे. दक्षिण आफ्रिकेत शीर्ष १०% लोकांना ६६% उत्पन्न आणि ८५% संपत्ती मिळते. या तुलनेत स्वीडन, नॉर्वेसारख्या युरोपीय देशांमध्ये खालच्या ५०% लोकांना २५% उत्पन्न मिळते, जी एक चांगली स्थिती दर्शवते. रिपोर्टमध्ये हेही म्हटले आहे की, १९८० मध्ये जागतिक मध्यम ४०% (Global Middle 40%) मध्ये असलेला भारताचा मोठा लोकसमूह २०२५ पर्यंत जवळजवळ पूर्णपणे तळातल्या ५०% मध्ये ढकलला गेला आहे, तर चीन वरच्या स्तरावर गेला आहे. हा अहवाल २०० हून अधिक तज्ज्ञांनी १८० देशांमधून गोळा केलेल्या डेटाच्या आधारे तयार केला आहे.