पुणे, दि. 13 – मधुमेह रुग्णांची संख्या भारतात एवढ्या वेगाने वाढत आहे की, आता भारत मधुमेह्यांचे “हब’ बनत चालला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दि.14 नोव्हेंबर या “जागतिक मधुमेह दिना’निमित्त याविषयी गेल्या अनेक वर्षांपासून जनजागृती करण्यात येत आहे. देशात मधुमेहाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे आणि त्यामुळे आरोग्याची गंभीर चिंता निर्माण झाली आहे. सन 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या अहवालानुसार, भारतातील 74 दशलक्षाहून अधिक प्रौढ लोक मधुमेहासह जगत आहेत. “इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च – इंडिया डायबिटीज’ (आयसीएमआर – आयएनडीआयएबी) यांनी 15 राज्यांमध्ये केलेल्या अभ्यासावर आधारित, पूर्व-मधुमेहाचे प्रमाण 10.3% आणि मधुमेह 7.3% होते. हे पाहता आपली जागरूकता वाढवणे अत्यावश्यक आहे. प्री-डायबेटिस रोखणे ही टाइप 2 मधुमेहाच्या प्रगतीवर नियंत्रण ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. सक्रिय राहणे, निरोगी खाणे यासारखे आपल्या जीवनशैलीत छोटे-छोटे आणि सजग बदल केल्याने प्रीडायबिटीस टाळता येऊ शकतो तसेच पूर्ववत करू शकतो. अभ्यासात असे दिसून आले आहे की प्रथिनांचे प्रमाण वाढवणे आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचे सेवन कमी केल्याने मानवी शरीरातील रक्तातील साखरेच्या पातळीत बदल घडवून आणू शकतात. असेच एक अन्न म्हणजे बदामासारखा सुकामेवा. बदाम हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न आहे आणि त्यात वनस्पती प्रथिने, आहारातील फायबर, चांगले स्निग्ध पदार्थ आणि व्हिटॅमिन-ई, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखी महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात ज्यामुळे ते प्री-डायबेटिस किंवा टाइप 2 मधुमेह असलेल्यांसाठी एक स्मार्ट स्नॅक बनतात. निरोगी जेवण योजनेचा एक भाग म्हणून दररोज खाल्ल्यास, बदाम वजन व्यवस्थापनापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत आणि त्यापलीकडे अनेक प्रकारचे आरोग्य फायदे देतात. जीवनशैली बदला पौगंडावस्थेतील पूर्व-मधुमेहावर विशेष लक्ष केंद्रित करताना, 2018 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, भारतात पूर्व-मधुमेहाचे प्रमाण 14% आहे. भारतीयांमध्ये प्री-डायबिटीस (सुमारे 14-18%) पासून टाइप 2 मधुमेहाची वार्षिक प्रगती सर्वाधिक आहे, त्यामुळे हा ट्रेंड मागे घेण्यास मदत करण्यासाठी जीवनशैली बदलणे आवश्यक आहे. मधुमेहाच्या रुग्णांना हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याची किंवा पक्षाघाताचा झटका येण्याची जास्त शक्यता असते. संशोधन असे सूचित करते, की आहारात बदाम समाविष्ट केल्याने टाइप-2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी जोखीम घटक सुधारण्यास मदत होते.