नवी दिल्ली -भारतात यंदा होत असलेल्या आयसीसी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेच्या करंडकाचे अनावरण एका अनोख्या पद्धतीने करण्यात आले. अंतराळातील स्ट्रॅटोस्फेअर म्हणजेच स्थितांबरात या करंडकाचे अनावरण केले गेले. यानंतर हा करंडक थेट अंतराळातून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य सोहळ्यात उतरवण्यात आला.
या करंडकाला पृथ्वीपासून 1 लाख 20 हजार फूट उंचीवर असलेल्या स्थितांबरात सोडताना एका मोठ्या फुग्यावर बांधण्यात आले व हा फुगा करंडकासह अंतराळात सोडण्यात आला. या फुग्याला कॅमेरेही जोडले होते व त्याद्वारे अविश्वसनिय छायाचित्रेही टिपण्यात आली.
यामुळे जगभरातील विविध देश तसेच विविध शहरांमधील नागरिकांना हा करंडक पहायला मिळाला.
आयसीसीच्या या स्पर्धेचा हा करंडक यजमान भारतासह, कुवैत, बहरीन, मलेशिया, अमेरिका, नायजेरिया, युगांडा, फ्रान्स, इटली आदी 18 देशांचा दौरा करणार आहे. क्रिकेटचा प्रसार व विकास या कार्यक्रमांतर्गत ही मोहीम आयसीसी राबवणार आहे. हा विविध देशांचा दौरा संपल्यावर येत्या 4 सप्टेंबर रोजी हा करंडक भारतात दाखल होणार आहे. त्यानंतर भारतातील विविध शहरांत तो घेऊन जाण्यात येणार असून त्यानंतर स्पर्धेपूर्वी हा करंडक अहमदाबादेत आणला जाणार आहे.